पुणे : विहिरीत उडी मारून पुण्यातील (suicide) तरुणाने आत्महत्या केली. पुण्यातील बाणेर येथे कळमकर चौका जवळील विहिरीत तरुणाने उडी मारून जीवन संपल्याची घटना घडली. स्वप्निल राऊत असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. या आत्महत्येमागे मानसिक आजार व घरगुती वाद असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे. ही घटना 3 नोव्हेंबर रोजी रात्री रात्री साडेबाराच्या दरम्यान घडली आहे. त्यांच्या आत्महत्येमुळे काही काळ सोसायटीत गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. 


मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्नील हा मूळ बुलढाणा जिल्ह्याचा आहे. रात्री जेवण झाल्यानंतर घरातील सगळे झोपल्यावर या तरुणाने घरातून थेट विहीर गाठली आणि उडी मारली. दुसऱ्या दिवशी सकाळी घरातील मंडळीनी त्याचा शोध सुरू केला पण त्याचा पत्ता लागला नाही. त्यामुळे विहिरी शेजारच्या सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज पाहिले असता या तरुणाने स्वतः विहिरीत उडी मारल्याचे आढळले .या युवकाचे वडील, भाऊ शेजारी सोसायटीत वॉचमन म्हणून काम करतात.


स्वप्नील हा हिंजवडीमधील येथे एका लहान कंपनीमध्ये कामाला होता. गेल्या दोन वर्षापासून त्याला मानसिक त्रास होत होता. त्याच बरोबर त्याच्या व्यसनामुळे घरात सतत भांडणे होत होती. यातूनच या तरुणाने आत्महत्या केली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. 


MIT कॉलेजच्या विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य



काही  दिवसांपूर्वीच पुण्यातील कोथरुड MIT कॉलेजमध्ये शिकणाऱ्या बीबीएच्या तरुणाने आत्महत्या केली होती. विद्यार्थ्याने सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या  केल्याची घटना घडली होती. त्यामुळे कॉलेजमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती.  हा तरुण बीबीएच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होता. विनीत मारु हा कोथरुड येथील एमआयटी महाविद्यालयात बीबीएच्या पहिल्या वर्षात शिकत होता. त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिसांना त्याच्याजवळ सुसाईड नोट सापडली नाही.


नैराश्येतून आत्महत्येत वाढ


सध्या पुणे शहरात आत्महत्येच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. त्यात तरुणांच्या आत्महत्येचं प्रमाण जास्त आहे. क्षुल्लक  कारणावरुन अनेक तरुण आत्महत्येचं पाऊल उचलताना दिसत आहे. कोरोनानंतर अनेक विद्यार्थी नैराश्यात आहेत. सोशल मीडियामुळे नैराश्य वाढत असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे अनेकांनी शारिरीक आणि मानसिक आरोग्य जास्त प्रमाणात जपावं, असं आवाहन तज्ञांनी केलं.


इतर महत्वाची बातमी-


Nashik News : नाशिकमध्ये महिला उमेदवार सदस्यांचे पती आणि समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी, धारगाव ग्रामपंचायत निवडणूक