पुणे : पुण्यात क्षुल्लक कारणावरुन होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. जेवणाच्या बिलावर लावलेल्या (Pune Crime News) सर्व्हिस टॅक्स वरुन ग्राहकाला बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार पुण्यात समोर आला आहे. हॉटेलच्या मॅनेजरने वेटरला सोबत घेत ग्राहकाला मारहाण केली. पुण्यातील सुप्रसिद्ध हॉटेल स्पाईस फॅक्टरीमध्ये हा प्रकार घडला आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, हुजेफा अत्तरवाला हे आपल्या मित्र-मैत्रिणींसह एनआयबीएम रस्त्यावर असलेल्या स्पाईस फॅक्टरी या हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. हॉटेलमध्ये जेवण झाल्यानंतर त्यांच्या जेवणाच्या बिलावर आलेल्या सर्व्हिस टॅक्सबाबत त्यांनी हॉटेल मॅनेजरला विचारणा केली. या गोष्टीचा राग मनात ठेऊन हॉटेल मॅनेजरने 5 ते 6 वेटरला हाताशी घेऊन अत्तरवाला यांना काचेच्या बॉटलने तसेच काचेच्या बरणीने मारहाण केली. याप्रकरणी हॉटेल मॅनेजरसह इतर वेटरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


तक्रारीनुसार ही घटना शुक्रवारी दुपारी 3.45 च्या सुमारास घडली. मोहम्मदवाडी येथील 38 वर्षीय व्यावसायिक हुजेफा मुस्तफा अत्तरवाला मित्र-मैत्रिणींसोबत रेस्टॉरंटमध्ये गेले होते. बिलाची तपासणी केल्यावर एकूण 2030 रुपये होते. त्यावर 176.50 रुपये अतिरिक्त पैसे दिसले. या पैशांची विचारपूस करण्यासाठी गेले असता त्याला व्यवस्थापकाशी बोला असं सांगण्यात आलं. मात्र यावेळी पैशासंदर्भात काहीही उत्तर न देता व्यवस्थापकाने अरेरावीची भाषा केली. त्यानंतर व्यवस्थापकाने ग्राहकाला 'भिकारी' अशा शब्दांत शिवीगाळ केली. अत्तरवाला यांनी रेस्टॉरंटच्या मालकांशी संपर्क साधून समस्या सोडवण्याची विनंती केली, मात्र व्यावस्थापक अरेरावी करत राहिला. यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली. 


यानंतर अत्तरवाला यांनी या प्रकारासंदर्भात माहिती देण्यासाठी मित्रांना बोलावून घेतलं. हे पाहून व्यवस्थापक आणखी चिडला आणि त्याने आणि हॉटेलमधील काही वेटरने मिळून काचेच्या भांड्याने आणि काचेच्या बॉटलने मारहाण केली. यात अत्तरवाला जखमी झाले. या घटनेनंतर अत्तरवाला आणि त्यांच्या साथीदारांनी कोंढवा पोलीस ठाण्यात या प्रकरणाची तक्रार केली. ससून रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आला. मात्र या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.


पुण्यात गुन्हेगारीत चांगलीच वाढ होत असल्याचं मागील काही दिवसांपासून समोर आलं आहे. तरुणांची अरेरावी वाढत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी विनाकारण वादावादी निर्माण होऊन अशाप्रकारच्या घटना घडत आहेत. पोलिसांनी अशाप्रकारच्या घटना रोखण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत आणि काही उपाययोजनादेखील राबवल्या आहेत. मात्र या घटना रोखण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Pimpri Chinchwad Crime : भिशीच्या पैशांवरुन वाद विकोपाला गेला आणि गाडीतच गोळीबार केला, पिंपरीतील खून प्रकरणात दोघे अटकेत