Pune Crime News :  स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय (Pune Crime) सुरु असल्याचं उघडकीस आल्यानंतर पुण्यातील वारजे-माळवाडी परिसरात ओम स्पावर छापा टाकून गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली आहे. या प्रकरणी स्पा सेंटरच्या मॅनेजरला पुणे पोलिसांनी अटक केली आहे.  संदीप संतोष तिवारी (वय 23) असं स्पा मॅनेजरचं नाव आहे.  


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडी येथील ओम स्पामध्ये मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय केला जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक पाठविला. त्याने इशारा करताच सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता ओम स्पावर सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने छापा टाकला. तेथे दोन महिलांकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात होता. संदीप तिवारी या मॅनेजरला अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 12 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.


पुण्यात यापूर्वीही दोन ठिकाणी छापा टाकण्यात आला होता.  सिंहगड रोडवरील नांदेड सिटीतील स्पा सेंटरवर पुणे ग्रामीण पोलिसांनी छापा टाकला होता. यात वेश्या व्यवसाय करणाऱ्या एक परदेशी आणि दोन स्थानिक तरुणींची सुटका केली होती. सेंटर मॉलमधील ब्लू बेरी स्पा मसाज असं या स्पा सेंटरचं नाव होतं. या प्रकरणी चार जणांवर पुणे ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मसाज सेंटरचे मालक मुंजा रामदास शिंदे (वय 31 रा.वडगाव ता.हवेली जि.पुणे), व्यवस्थापक योगेश पवार (रा.नांदेड गाव ता.हवेली जि.पुणे ), अथर्व प्रशांत उभे (वय 19 रा.धायरी, बेनकरवस्ती ता.हवेली जि.पुणे) आणि महिला व्यवस्थापक ज्योती विपुल वाळींबे (वय ३० रा.न-हे, ता.हवेली जि.पुणे) या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.


दुसरा छापा  विमाननगर भागात टाकण्यात आला होता. मसाज सेंटरच्या नावाने सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला होता. या कारवाईत मसाज सेंटरच्या व्यवस्थापकाला अटक करण्यात आली होती आणि वेश्या व्यवसाय करणाऱ्या तीन महिलांना अटक करण्यात आली होती.


छाप्यांच्या प्रमाणात वाढ 
स्पा सेंटरच्या छाप्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. अनुचित प्रकार आढळल्यास पोलिस सापळा रचून थेट कारवाई करत आहे. त्यामुळे पुण्यातील अनेक अशा अवैध कारभारांना वचक बसताना दिसतो आहे. त्यामुळे अशा कारवाया करण्यासाठी पुणे पोलिस पुढाकार घेत असल्याचं दिसून येत आहे.