पुणे : जेवण नाकारल्याने एका मद्यधुंद चालकाने त्याचा कंटेनर थेट हॉटेलमध्ये घुसवल्याची घटना इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव येथे घडली. त्या चालकाने आधी हॉटेल समोरील दोन चारचाकी गाड्यांना कंटेनरची धडक देत त्याचा चुराडा केला. नंतर हॉटेलचेही नुकसान केलं. या प्रकरणी कंटेनर चालकाला तिथल्या लोकांनी पोलिसांच्या हवाली केलं आहे.
पुण्याच्या इंदापूरमध्ये मद्यधुंद कंटेनर चालकाने थरार पहायला मिळाला. पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापुरातील हिंगणगांव येथे रोड लगत असणाऱ्या हॉटेल गोकुळ येथे जेवण नाकारल्याच्या कारणातून एका मद्यपान केलेल्या कंटेनर चालकाने नशेत कंटेनर चालवत एक स्कुटी, एका कारसह हॉटेलचे नुकसान केलं.
जेवण नाकारल्याच्या रागातून कृत्य
सोलापूरकडून पुण्याच्या दिशेने MH 12 RN 4359 क्रमांकाचा हा कंटेनर घेऊन चालक निघाला होता. दरम्यान हिंगणगाव येथील हॉटेल गोकुळ वरती चालकाने वाहन थांबवले आणि त्याने हॉटेल मध्ये जाऊन जेवण मागितलं. मात्र हॉटेल बंद असल्याचे सांगत त्याला जेवण नाकारण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
त्यानंतर त्या कंटेनर चालकाने हॉटेलच्या बाहेर एक राऊंड मारत समोर असलेल्या गाडीला जोरदार धडक दिली. त्यानंतर लोकांनी त्या कंटेनर चालकाला गाडी थांबवण्याचं आवाहन केलं. त्यानंतर गाडीचालकाने गाडी थांबवली. नंतर लोकांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं.
पुणे-सोलापूर महामार्गावर रात्रीच्या वेळी मोठी गर्दी असते. अशात ही घटना घडली. सुदैवाने या अपघातात जिवितहानी झाली नाही.