Pune Shivneri-Shivai Bus News: मुंबई-पुणे महामार्गावरुन शिवनेरी बस हद्दपार करत एसटी महामंडळात नव्याने रुजू झालेली शिवाई चालवण्याता विचार एसटी महामंडळाचा आहे. येत्या काही महिन्यात 100 शिवाई इलेक्ट्रिक बस मुंबई-पुणे महामार्गावरुन धावणार आहे. त्यासोबतच मागील काही वर्षांपासून मुंबई-पुणे प्रवास सुखकर करणारी शिवनेरी बस हद्दपार केली जाणार आहे. या निर्णयामुळे प्रवास खर्च कमी होण्याची शक्यता आहे.
प्रवासाचा खर्च कमी होणार
मुंबई-पुणे प्रवासासाठी शिवनेरी बसच्या तिकीटाचा खर्च साधारण 450-500 रुपये येतो. त्यामुळे सर्वसाधारण जनतेसाठी ही रक्कम मोठी असते. पेट्रोलचे भाव वाढल्याने अजून या तिकीटांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र नव्याने रुजू झालेली शिवाई ही इलेक्ट्रिक बस आहे. त्यामुळे याचे तिकीटदर कमी असेल. साधारण 300-350 रुपये तिकीट भाडं असण्याची शक्यता आहे. येत्या चार ते पाच महिन्यात 150 शिवाई बस एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार आहे. यातील 50 बस पुणे-नगर मार्गावर तर 100 शिवाई बस मुंबई-पुणे मार्गाकरीता वापरल्या जाणार आहे.
पुणे-नगर मार्गावर पहिली शिवाई धावली
1 जुन 2022 रोजी पुणे-नगर मार्गावर पहिली इलेक्ट्रिक बस शिवाई धावली. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते या बसचे पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर उद्घाटन करण्यात आलं. पुणे- नगर मार्गावर इलेक्ट्रिक बस सुरु केल्यानंतर एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.
जिल्हा टू जिल्हा ‘शिवाई’ धावणार
पुढील दोन वर्षात एसटी महामंडळाच्या ताफ्यात मोठ्या प्रमाणात शिवाई बसेस दाखल होणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात शिवाई धावणार असा एसटी महामंडळाचा विचार आहे. सर्वाधिक चालणाऱ्या मार्गावर शिवाई बसेस अधिक प्रमाणात चालवल्या जाणार आहे. 'जिथे गाव, तिथे एसटी' अशी संकल्पना अनेक वर्षांपुर्वी एसटी महामंडळाने राबवली होती. त्यानुसार आज प्रत्येक गावागावात एसटी सहज बघायला मिळते. पेट्रोलच्या किमतीने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे येत्या काळात एसटीच्या दरात देखील वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र येत्या काळात या इलेक्ट्रिक बसचा सर्वसाधारण नागरिकांना फायदा होणार आहे. तिकीटांच्या दरात देखील तफावत जाणवण्याची शक्यता आहे.