Pune News: भविष्यात जर महानगरपालिका प्रशासनाने नाले साफ केले नाही तर त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनाच नाल्यात उतरवू, अशी आक्रमक भूमिका मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी घेतली आहे. पुण्यातील नालेसफाईचे काम अपुर्ण आहे किंवा नालेसफाई झालीच नाही, यावरुन पुण्याच्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत पुणे महानगरपालिकेसमोर आंदोलन केले आहे.यावेळी पुणे शहराचे मनसेचे नवे शहराध्यक्ष साईनाथ बाबर उपस्थित होते.


पुणे शहरामध्ये एकूण 236 नाले आहेत त्यातील 170 नाले पुणे शहरातून वाहतात. त्यातील अनेक नाल्यांची सफाई झालीच नाही. ज्या नाल्यांची सफाई झाली ते फक्त फोटोसेशनपुर्ती मर्यादित होती. या नालेसफाईच्या टेंडरमध्ये प्रचंड घोटाळा असतो. त्या घोटाळ्यात अनेक अधिकाऱ्यांना पैसै खायचे असतात. त्यामुळे फक्त दाखवण्याकरीता मधला गाळ काढून बाजुला टाकायचा. हे योग्य नाही. भविष्यात जर महानगरपालिका प्रशासनाने नाले साफ केले नाहीत तर त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनाच नाल्यात उतरवू, अशी आक्रमक भूमिका मनसे शहराध्यक्षांनी घेतली आहे.


नाले खोलीकरण, रुंदीकरण किंवा अतिक्रमण या गोष्टी वेळेवर होणं गरजेचं आहे. ते आजपर्यंत पुण्यात झालं नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचतं. त्याच्या त्रास नागरिकांना होतो. त्यांचं अति प्रमाणात नुकसान देखील होतं. मात्र नालेसफाईचं काम नीट झालं तर नालेलगत राहणाऱ्या नागरिकांना देखील दिलासा मिळेल, असंही ते म्हणाले. दरम्यान, महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन पावसाळ्यापुर्वीच नालेसफाई केली पाहिजे. त्यामुळे दुर्घटनेचं प्रमाण कमी होईल, असंही मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं आहे.


महानगरपालिकेच्या हद्दीत एकून 236 नाले आहेत. त्या नाल्यांची अवस्था खराब आहे. दरवर्षी पावसाळ्यापुर्वी यातील काहीच नाल्यांची सफाई केली जाते. पुणे शहरातून 170 नाले वाहतात. या नाल्याची सफाई नीट केली जात नाही. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागतात. काही वर्षांपुर्वी नालेसफाई न झाल्याने आंबिल ओढा परिसरातील वस्तीत पाणी शिरलं होतं. त्यात अनेक नागरिकांचे संसार उद्वस्त झाले होते.