पुणे: शिरूरचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation Protest) राजीनामा द्यावा अन् केंद्र सरकारवरचा दबाव वाढवावा अशी मागणी एका मराठा बांधवाने केली. खासदार कोल्हे यांच्यासारखाच आवाज असणारी संभाषणाची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे. पण यातील आवाज हा खासदार कोल्हे यांचाच आहे, याबाबतची पुष्टी एबीपी माझा करत नाही. 


सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नाही, अशावेळी केवळ आमदारांनी आणि खासदारांनी राजीनामे देऊन प्रश्न मिटणार नाही. तर राज्यातील अठ्ठेचाळीस खासदारांनी राजीनामे देऊन केंद्र सरकारवर दबाव वाढवावा. कारण मराठा आरक्षण हे राज्य नव्हे तर केंद्र सरकारच देऊ शकते. फोनवर खासदार कोल्हे यांच्याशी बोलताना मराठा बांधवाने अशी मागणी केली. 


मराठा बांधवााच्या या मागणीवर समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने आंदोलनाला बसलेल्या मनोज जरांगे यांच्या भूमिकेची आठवण करून दिली. केंद्रात आवाज उठवण्यासाठी केवळ राजीनामा देऊन अन् त्या राजीनाम्याच्या बातम्या आणून चालणार नाही. असा सावध पवित्रा या कॉलमध्ये घेतल्याचं दिसून येतंय. 


मात्र तरीही तुम्ही राजीनामा द्याल आणि त्याची आम्ही वाट पाहू यावर तो मराठा बांधव ठाम राहिल्याचं या फोन वरील संभाषणातून दिसून आलं. कोल्हे यांच्या सारखाच आवाज या ऑडिओ क्लिपमध्ये असल्याचं बोललं जातंय. पण हा आवाज खासदार कोल्हे यांचाच आहे, याची पुष्टी एबीपी माझा करत नाही.


खासदार हेमंत गोडसे यांचा राजीनामा


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी राजीनामा दिला आहे. त्या आधी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी आपला राजीनामा दिला होता. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आता दोन खासदारांनी राजीनामे दिले आहेत. आंदोलकांनी गोडसे यांना समाजासाठी तुम्ही खासदारकीचा राजीनामा द्या, तुम्हाला आम्ही पुन्हा निवडून आणू असे सांगितले. त्यानंतर खासदार हेमंत गोडसे यांनी हा राजीनामा पक्षाचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिला आहे. 


बीडच्या भाजप आमदारांचा राजीनामा 


बीड जिल्ह्यातील गेवराई विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनीही मराठा आरक्षणासाठी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहित आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे.


ही बातमी वाचा: