पुणे : आरटीई अंतर्गत प्रवेश मिळाल्यानंतर (school) आठवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना शाळेतून बाहेर काढण्याचा प्रताप पुण्यातील सिटी इंटरनॅशनल स्कूल (City International School) करू पाहत आहे. या विद्यार्थ्यांना आठवीच्या गुणपत्रिके सोबतच शाळा सोडल्याचा दाखला देण्यात येणार आहे. त्याबाबतच रीतसर पत्रच विद्यार्थ्यांच्या पालकांना पाठवण्यात आलं आहे. या सगळ्या प्रकारामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे शिवाय अचानक आलेल्या या पत्रामुळे पालकांची चिंता वाढली आहे.
शिक्षण हक्क कायद्यानुसार आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिलं जातं. खाजगी शाळांमध्ये 25% प्रवेश आरटीई नुसार करणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांना वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंत आरटीई चा लाभ देण्याची तरतूद आहे. त्याच आधारावर 2013 मध्ये प्रवेश घेतलेल्या प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला देण्याचा निर्णय सिटी इंटरनॅशनल स्कूल प्रशासनाने घेतला आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसमोर पुढच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात तर त्यांच्या पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रार केली आहे.
आरटीई कार्यकर्ता राजेश बेल्हेकर म्हणाले की, आर टी ई अंतर्गत वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंत मोफत शिक्षण देण्याची तरतूद असली तरी मुलांना शाळेतून बाहेर काढण्याचा अधिकार शाळेला नाही. त्याला पूर्ण शुल्क आकारून पुढच्या वर्गात देणे कायद्याने बंधनकारक आहे. शिक्षण संचालकांनी त्याबाबतचे आदेश जारी केले आहेत. शाळेकडून त्याचे पालन होणे गरजेचे आहे.
त्यासोबतच पालक योगेश पवार म्हणाले की, माझा मुलगा नववीत जाणार आहे. आठवीची परीक्षा सुरू असतानाच शाळेकडून हा मेल आला आहे. त्यामुळे त्याच्या मनावर आघात झाला आहे. आम्ही पूर्ण फी भरायला तयार आहोत. शाळेने आमच्या मुलांना पुढच्या वर्गात प्रवेश देऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे.
आठवीनंतर विद्यार्थ्यांना शाळेतून काढता येणार नाही!
पालक संबंधित शाळेचे शुल्क भरण्यास तयार असतील आणि विद्यार्थ्यांना त्याचा शाळेत पुढील शिक्षण पूर्ण करायचे असेल तर कोणत्याही शाळेला इयत्ता आठवीनंतर विद्यार्थ्यांना शाळेतून काढता येणार नाही,असे राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
इयत्ता आठवीपर्यंतच शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत शासनाकडून शुल्क प्रतिपूपूर्तीची रक्कम शाळांना दिली जाते.त्यामुळे आठवीनंतर विद्यार्थ्यांनी दुसरी शाळा शोधावी त्यांना आठवीनंतर शाळा सोडल्याचा दाखला दिला जाईल,अशा आशयाचे पत्र पुण्यातील सीटी इंटरनॅशनल स्कूलने पालकांना पाठवले होते. त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आक्षेप घेतला. तसेच शाळेविरोधात आंदोलन करून शिक्षण संचालकांकडे याबाबत तक्रार केली होती.
इतर महत्वाची बातमी-