लोणावळा, पुणे : ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी आमदार सुनिल शेळके यांच्यावर हल्लाबोल केला. तू आमदार कुणामुळे झालास, तुला सोडणार नाही, असं शरद पवार म्हणाले.  लोणावळ्याच्या (Lonavala) सभेत पवारांनी हे वक्तव्य केलं आहे.  त्यानंतर आता सुनील शेळके  (Sunil Shelke) यांनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे. 'शरद पवारांचा आम्हाला आदर आहे. पण आम्ही कायम अजित पवारांच्या पाठिशी राहणार आहोत. पद आणि राजकीय कारकिर्द आम्ही डोळ्यासमोर ठेवून राजकीय काम करत नाही. त्यामुळे शरद पवारांनी हे वक्तव्य का केलं?, याचा मी नक्की विचार करेन', असं ते म्हणाले आहेत. 


सुनील शेळके नेमकं काय म्हणाले ?


शरद पवारांनी टीका केल्यानंतर सुनील शेळकेंनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, शरद पवारांबाबत आजही आम्हाला श्रद्धा आहे.  त्यांनी माझ्या संदर्भात असं वक्तव्य का केलं?, या संदर्भात मला कल्पना नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा कार्यकर्ता म्हणून मी अजित पवारांबरोबर खंबीर पणे उभा राहणार आहे. भविष्यातदेखील असणार आहे. मात्र साहेब किंवा त्यांच्या बरोबर असलेले नेते माझ्या मतदार संघात येऊन वक्तव्य करत आहेत. मी कोणाला दम दिला, माझ्या वाटेला कोणी जाऊ नका, असं सांगितलं त्यांच्याकडून जात आहे.  मला त्यांनी त्या कार्यकर्त्यांचा फोन नंबर द्यावा मी दिलगिरी व्यक्त करेन, असं ते म्हणाले.


मावळमधील जनता सुज्ञ


'पवार साहेब मावळमध्ये येताना त्यांच्यासोबत अनेक राष्ट्रवादीतील राज्याचे नेते असताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते येत नसतील आणि उबाठा आणि बाकी कार्यकर्ते घेऊन त्यांना मेळावा करावा लागत आहे', अशी टीका त्यांनी शरद पवारांवर केली आहे. मावळ तालुक्यातील जनता अजित पवारांच्या पाठिशी आहे. विकासकामांच्या मावळ तालुका बदलतो हे लक्षात आलं आहे, असंही ते म्हणाले आहेत. शिवाय मावळ तालुक्यातील जनता सुज्ञ आहे. अजित पवारांच्या पाठिशी उभं राहण्याचा योग्य निर्णय मावळच्या जनतेने घेतला आहे. अजित पवारांच्या मागे मावळ तालुका खंबीरपणे उभा आहे. पद आणि राजकीय कारकिर्द आम्ही डोळ्यासमोर ठेवून राजकीय काम करत नाही. त्यामुळे शरद पवारांनी हे वक्तव्य का केलं?, याचा मी नक्की विचार करेन, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 



इतर महत्वाची बातमी-


Sharad Pawar : मला 'शरद पवार' म्हणतात, हे लक्षात असू द्या, माझ्या वाटेला गेलात तर मी कोणाला सोडत नाही; पवारांचा इशारा