पुणे : ड्रॅग्ज माफिया ललित पाटीलचा (Lalit Patil) भाऊ आणि त्याच्या (Sasoon Hospital Drug Racket) साथीदाराला पुणे पोलसांनी (Pune Police) नेपाळच्या सीमेवरून अटक केलेली असली तरी ललित पाटील नेपाळमध्ये (Nepal) पळून गेला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तर या प्रकरणात जोरदार राजकीय आरोप - प्रत्यारोप सुरु झाले आहेत. ललित पाटीलला पळवून लावण्यात शिंदे गटाचे मंत्री दादा भुसेंचा हात असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून होत आहे तर दादा भुसेंनी (Dada Bhuse) आरोप करणाऱ्यांवर बदनामीचा खटला दाखल करण्याचा इशारा दिला आहे .

  


ड्रग माफिया ललित पाटील नेपाळमध्ये पळून गेल्याची शक्यता व्यक्त होत आहे. मेफेड्रोन विक्रीच रॅकेट चालवत असल्यानं ललित पाटीलचे देशातील आणि देशाबाहेरील अनेक ड्रग्ज माफियांशी आधीपासूनच संबंध आहेत. त्याचाच आधार घेऊन ललित पाटीलने नेपाळमध्ये आश्रय घेतला असण्याची शक्यता आहे.  ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील आणि त्याचा साथीदार अभिषेक बलकवडे यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने नेपाळ सीमेवर अटक केली मात्र ललित पाटील पुणे पोलिसांना हुलकावणी देण्यात यशस्वी ठरला आहे . 


ललित पाटीलवरुन ठाकरे-शिंदे गटांचे आरोप प्रत्यारोप सुरु...


इकडे महाराष्ट्रात ललित पाटील प्रकरणावरून राजकीय धुळवड सुरु झाली आहे. ललित पाटीलला ससून रुग्णालयामध्ये भरती करून घेण्यासाठी शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी ससूनच्या डॉक्तरांना फोन केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येतो आहे. शिंदे गटानेही या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे . नाशिकमध्ये शिंदे गटाकडून सुषमा अंधारेंचा पुतळा जाळण्यात आला तर पुरावे देऊ शकला नाहीत बदनामीचा दावा दाखल करणार असल्याचं मंत्री दादा भुसेंनी म्हटलं आहे.
 


डॉक्टरांना सहआरोपी करा- धंगेकरांचं पोलीस आयुक्तांना पत्र


ऑक्टोबर 2020 मध्ये अटक झाल्यापासून ललित पाटील महिनोन्महिने ससून रुग्णालयात तळ ठोकून होता. या काळात सहा डॉक्टर त्याच्यावर उपचार करत होते. त्यात ड्रग्ज रॅकेट उघडकीस आल्यानंतर याच डॉक्टरांनी अचानक त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याची शिफारस केली आणि त्याचा उपयोग करून ललित पाटील ससूनमधून निसटला. त्यामुळं ससूनच्या डॉक्टरांना या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे. 


ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील हा केमिकल इंजिनियर असून तो मेफेड्रोन तयार करण्यात पटाईत आहे तर त्याचा साथीदार अभिषेक बलकवडे मेफेड्रोनची वाहतूक करायचा. या दोघांना न्यायालयात हजार केलं आहे. मात्र जोपर्यंत ललित पाटील हाती लागत नाही. तोपर्यंत सगळ्या गोष्टी पुढे येऊ शकणार नाही आहे.  


ललित नेपाळला पळाला...


मलेशिया , थायलंड आणि दुबई या देशांमध्ये ललित पाटील मेफेड्रोन पाठवायचा. इथे जसं त्यानं पोलीस आणि डॉक्टरांना हाताशी धरून ड्रॅग तस्करीच जाळं विणलं होतं तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील त्यानं नेटवर्क निर्माण केलं होतं. त्याचाच आधार घेत तो ससूनमधून निसटल्यानंतर नेपाळ सीमेवर पोहचला. या प्रकरणाची ही वाढत चाललेली व्याप्ती पोलीस आणि राज्यकर्त्यांसमोरील आव्हान आणखी वाढवणारी ठरते आहे.


इतर महत्वाची बातमी-