Pune : पुण्यात अभिषेकी बुवांच्या (Abhisheki Bua) स्मृतीदिनीच 'संगीत मत्स्यगंधा' (Sangeet Matsyagandha) या अजरामर नाटकाचा प्रयोग रद्द करण्यात आला आहे. शेजारील कार्यक्रमाच्या आवाजाच्या दणदणाटामुळे नाटकावर पडदा पडला आहे. 'डीजे' स्पीकरचा संगीत नाटकाला फटका बसला आहे. आवाजाच्या दणदणाटामुळे 'मत्स्यगंधा'चा प्रयोग रद्द करण्यात आला आहे.
नाट्यगृहाच्या प्रवेशद्वाराबाहेर नांदी सादर करून प्रयोग रद्द
अभिषेकी बुवा यांच्या 25 व्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यातील (Pune) कर्वे रोडवरील 'द बॉक्स' (The Box) नाट्यगृहात 'मस्त्यगंधा' या नाटकाच्या प्रयोगाचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान नाट्यगृहाशेजारी असलेल्या दुसर्या सभागृहात सुरू असलेल्या कार्यक्रमातील आवाजाच्या पातळीने मर्यादा ओलांडल्याने कलाकारांना सादरीकरण करणे अशक्य झाले आणि अखेर नाट्यगृहाच्या प्रवेशद्वाराबाहेर नांदी सादर करून प्रयोग रद्द करण्यात आला.
नेमकं प्रकरण काय?
कलाद्वयी संस्थेतर्फे एरंडवण्यातील 'द बॉक्स' या नाट्यगृहात 'संगीत मत्स्यगंधा' नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. नाट्यगृहाबाहेर 'हाऊसफुल्ल'चा बोर्डही झळकला होता. मात्र नाट्यगृहाशेजारीच असलेल्या 'पुणे स्टुडिओ' येथे सुरू असलेल्या एका कार्यक्रमातील ध्वनीक्षेपकांचा आवाज प्रमाणापेक्षा अधिक झाला.
वारंवार विनंती करूनही 'पुणे स्टुडिओ'मध्ये पार पडत असलेल्या कार्यक्रमाचा आवाज कमी झाला नाही. अखेर 'संगीत मत्स्यगंधा' नाटाकाच्या टीमने नाट्यगृहाबाहेर येत रसिकांची क्षमा मागत प्रयोग रद्द करत असल्याची घोषणा केली. डीजे आणि लाऊड स्पीकरच्या आवाजाचा त्रास अनेकदा नाट्यकर्मींना आणि प्रेक्षकांना सहन करावा लागतो. आज या गोष्टीचा फटका कलाद्वयी या संस्थेच्या कलाकारांना बसला आहे.
'संगीत मत्यस्यगंधा'च्या टीमकडून सखेद दिलगिरी व्यक्त
नाटकाचा प्रयोग रद्द करावा लागल्याने 'संगीत मत्यस्यगंधा'च्या टीमकडून सखेद दिलगिरी व्यक्त करण्यात आली. सखेद दिलगिरी व्यक्त करत त्यांनी म्हटलं आहे,"काल आणि आज संगीत मत्यस्यगंधा'चे प्रयोग 'द बॉक्स'मध्ये आयोजित केले होते. परंतु वारंवार विनंती आणि अर्ज करूनही आपल्या शेजारी कार्यक्रमांची दखल न घेण्याच्या आयोजक आणि संबंधितांच्या धोरणामुळे आवाजाच्या विचित्र पातळीचा त्रास आपल्या या नाटकाला नक्कीच होणार आहे. असमंजस आयोजकांपुढे केवळ नाइलाजाने आजचा आपला प्रयोग रद्द करावा लागत आहे..क्षमस्व".
कलाद्वयी संस्थेचे संजय गोवासी म्हणाले,"अभिषेकी बुवांच्या स्मृतिदिनी 'संगीत मत्यस्यगंधा' या अजरामर नाटकाचा प्रयोग रद्द करावा लागणं हे दुर्दैवी आहे. शेजारील कार्यक्रमांच्या संयोजकांना विनंती करूनही त्यांनी सहकार्य न केल्याने आमचाही नाईलाज झाला. रसिकांना आम्ही त्यांच्या तिकिटाचे पैसे परत करणार आहोत".
संबंधित बातम्या