Pune Dahihandi 2022: मुंबई ठाण्यासह पुण्यातही दहीहंडी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. यंदा कोरोनानंतर दोन वर्षांनी दहीहंडी होणार असल्याने गोविंदामध्ये मोठा जल्लोष बघायला मिळतो आहे. दोन वर्ष कोरोनामुळे अनेकांनी निर्बंधासह दहीहंडी साजरी केली मात्र यावर्षी राज्यभरात मोठा उत्साह बघायला मिळतो आहे. पुण्यात अनेक पारंपारिक दहीहंडी आहेत त्यात महत्वाच्या दहीहंडीच्या जल्लोषाच्या ठिकाणी मोठी गर्दी बघायला मिळते.
पुण्यात काही मानाच्या आणि महत्वाच्या दहीहंडी आहेत. त्यात बाबूगेनू, दगडूशेठ मंडळ, मनसेची महिला दहीहंडी मंडळ, अकरा मारुची चौक आणि खजिना विहीर दहीहंडी मंडळ या पाच मंडळांचा समावेश आहे. या पाचही ठिकाणी जल्लोष करण्यासाठी पुणेकर मोठी गर्दी करतात. दरवर्षी या दहीहंडीचं वेगळेपण बघायला मिळतं. यंदा पुणे मेट्रोचं काम सुरु असल्याने बाबूगेनू आणि दगडूशेठ या दोन्ही दहीहंडी आमने-सामने असणार आहेत. त्यामुळे दोन्ही मंडळात मोठ्या प्रमाणात उत्साह आहे. त्यासोबतच काही महत्वाची वैशिष्ट्य असलेले दहीहंडी मंडळ आहे त्यात खजिना विहीर मंडळाचा समावेश आहे. पुस्तक दहीहंडी ही मानाची पहिली पुस्तक दहीहंडी आहे. या मंडळातर्फे विविध सामाजिक संदेश दिले जातात.
ढोल ताशाचा जल्लोष
पुण्यात गणपती, दहीहंडी किंवा कोणतीही मिरवणूक ढोल ताशांच्या जल्लोषाशिवाय पुर्ण होत नाही त्यामुळे या महोत्सवात देखील सगळे ढोल ताशा पथकं या जल्लोषासाठी सज्ज झाली आहेत. प्रत्येक मंडळात वेगळं पथक असणार आहे. त्यात पुण्यातील प्रसिद्ध नादब्रम्ह, शिवगर्जना पथकांचा देखील समावेश आहेत.
शिंदे गटाची मोठी दहीहंडी
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षाकडून दहीहंडीत मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता आहे. त्यात सगळ्यात मोठी दहीहंडी शिंदे गटाचे नगरसेवक नाना उर्फ प्रमोद भानगिरे यांच्या मंडळाच्या माध्यमातून होणार आहे. पुण्यातील हांडेवाडीमध्ये धर्मवीर आनंद दिघे दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.या दहीहंडी उत्सवाला शिंदे गटाचे दिग्गज नेते मंत्री तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, आमदार शहाजी पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार असल्याची माहिती आहे. शिंदे गटाने उठाव केल्यानंतर हा पहिलाच सार्वजनिक सण असणार आहे. या माध्यमातून जनतेपर्यंत पोचण्याचा त्यांच्या प्रयत्न असणार आहे. पुण्यातील सगळ्यात मोठी दहीहंडी शिंदे गटाकडून होणार असल्याने शहरात राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. यंदा मात्र भानगिरे यांच्या दहीहंडीत काही महिला पथकांचा देखील समावेश असल्याचं भानगिरे यांनी सांगितलं आहे. या माध्यमातून लाखोंचं बक्षिससुद्धा दिलं जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.