Pune Traffic News: मागील काही दिवसांपासून (Pune Traffic News) पुण्यात (Pune News) वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यातच जागतिक वाहतूक कोंडीत पुणे जगात सहाव्या क्रमांकावर असल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. राहण्यासाठी योग्य आणि शिक्षणाचं माहेरघर असलेलं पुणे आता वाहतूक कोंडीत जगात 6 व्या क्रमांकावर आल्यानं पुणेकर चांगलेच चिंतेत पडले आहेत. येत्या काही दिवसांत पुण्यात वाहतूक कोंडी अजून वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जगभरातील विविध देशांच्या मोठ्या शहरातील वाहतूक कोंडीचा सर्व्हे करून एका खाजगी संस्थेनं हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. टॉम टॉम या (Tom Tom survey) कंपनीनं वाहतूक कोंडीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, भारतातील तीन शहरांत सर्वाधिक ट्रॅफिक असल्याचं समोर आलं आहे. बंगळुरू जगात दुसऱ्याया क्रमांकावर, पुणे सहाव्या तर दिल्ली सतराव्या क्रमांकावर आहे. पुणे शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे, त्यासोबतच वाहतूकीची कोंडीची समस्याही पाहायला मिळत आहे. अनेक पुणेकर वाहतूक कोंडीमुळे हैराण झाले आहेत.
वाहतूक कोंडीवर उपाय काय?
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे. सायकलिंगसारख्या वाहतुकीच्या पर्यायी पद्धतींना चालना देणं आणि गर्दीच्या ठिकाणी वाहतूक व्यवस्थापन धोरणं राबवणं यांसारख्या अनेक उपाययोजना पुणे वाहतूक कोंडीच्या समस्यांचा सामना करण्यासाठी करू शकते, असं अहवालात सुचवलं आहे.
10 किलोमीटर प्रवासासाठी किमान 27 मिनिटं
पुण्यात मागील काही दिवसांपासून मेट्रोचं कामदेखील सुरु आहे. त्यामुळेदेखील काही भागांत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होतोना दिसत आहे. या संस्थेनं 10 किलोमीटर अंतर जाण्यासाठी लागणाऱ्या वेळेवरून निष्कर्ष काढला आहे. पुण्यात 10 कि.मी अंतर जाण्यासाठी 27 मिनिटं लागत असल्याचं या सर्व्हेतून समोर आलं आहे.
वाहतूक कोंडीची कारण?
पुण्यात आज जवळपास 45 लाख वाहनं आहेत. त्यात 8 लाख कार आणि घरातील प्रत्येकाची वेगळी दुचाकी असल्यानं दुचाकीची संख्या तुलनेनं जास्त आहे. तब्बल 35 लाखांपेक्षा जास्त दुचाकी पुण्यात आहेत. त्यात पुण्यात पुणेकर खासगी वाहनांचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. यात PMPML ची स्थिती, त्याचे मार्ग, उड्डणापुलाचं सुरु असलेलं काम आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे, शहरभर मेट्रोचं काम सुरु आहे. त्यामुळे अनेक मार्ग वाहतुकसाठी बंददेखील ठेवण्यात येत आहे. त्यामुळे पुण्यातील वाहतूक कोंडीत वाढ होत आहेत.
जगात लंडन पहिल्या क्रमांकावर
वाहतूक कोंडीच्या यादीत ब्रिटनची राजधानी लंडन पहिल्या क्रमांकावर आहे. तर भारताचं आयटी हब बंगळुरू या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशाची राजधानी दिल्ली 34 व्या क्रमांकावर आहे, तर मुंबईला लागून असलेलं पुणे शहर या यादीत 6 व्या क्रमांकावर आहे.