Chandani Chowk Flyover : चांदणी चौकातील (Chandani Chowk Flyover) उड्डाणपुलाच्या प्रकल्पाचं 10 टक्के काम शिल्लक राहिलं आहे. येत्या दोन महिन्यात हे काम पूर्ण होईल असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. उद्या म्हणजेच महाराष्ट्र दिनी (Maharashtra Day 2023) या उड्डाणपुलाच्या कामाचं उद्घाटन करु असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी जाहीर केलं होतं. मात्र हवी ती साधनं वेळेत उपलब्ध न झाल्याने या कामाला आता दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. 90 टक्के भाग पूर्ण झाला आहे आणि काही मार्ग वाहतुकीसाठीदेखील उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. 


कोणतं काम पूर्ण?


कोथरुडहून मुळशीकडे जाणारा अंडरपास सोमवारपासून सुरु झाला. हा 850 मीटरचा रस्ता आहे. बावधन-पाषाणमार्गे वारजे, कात्रजला जाणारा रॅम्प सुरु झाला आहे. मुळशीमार्गे मुंबईला जाणारा मार्ग सुरु करण्यात आला आहे. मुळशीहून कोथरुड, साताऱ्याकडे जाणारा मार्गही सुरु करण्यात आला आहे. कोथरुडहून बावधनला जाणाऱ्या 80 टक्के काम पूर्ण  झालं आहे आणि या रस्त्यावरुन वाहतूक सुरु केली आहे. वेद विहारहून एनडीएकडे जाणारा रस्ताही पूर्ण झाला आहे. कोथरुडहून मुंबईला जाणाऱ्या सेवा रस्त्यावरुन वाहतूक सुरु झाली आहे. त्यामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी कमी झाल्याचं चित्र आहे. 


कोणतं काम बाकी?


एनडीए चौक ते बावधनला जोडणाऱ्या 150 मीटर लांबीच्या पुलाचे काम अजूनही सुरुच आहे. 150 मीटर लांबीच्या आणि 32 मीटर रुंदीच्या पुलासाठी एकूण 22 खांब उभारणं सुरु आहे. 22 पैकी बावधनच्या बाजूचे 10 खांब उभारले आहेत. एनडीएच्या बाजूचे 12 खांब उभारण्याचं काम सुरु करण्यात आलं आहे. रॅम्प क्रमांक तीन आि सातचे काम 20 टक्के अपूर्ण आहे. त्यामुळे या कामाला वेळ लागण्याची शक्यता आहे. खांब तयार नसल्याने गर्डर टाकले नाही आहेत. त्यामुळे येत्या दोन महिन्यात ही सगळी कामं पूर्ण करण्यात येईल आणि त्यानंतर उद्घाटन करण्यात येईल. 


चांदणी चौकातील वाहतूक कोंडी सुटणार का?


मागील काही महिन्यांपासून चांदणी चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या उड्डाणपुलाचं काम सुरु असल्याने वाहतुकीसाठी मोठी समस्या निर्माण होत होती. चांदणी चौकातील हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर वाहतूक कोंडी फुटणार असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे या पुलाचं लोकार्पण झाल्यानंतर खरंच वाहतुकीत काही फरक जाणवेल का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.


संबंधित बातमी


Chandani Chowk Flyover : चांदणी चौकातील प्रकल्पाच्या उद्घाटनाला पुन्हा दोन महिने लागणार