Sharad Pawar : वयाच्या  6 व्या दिवशी मी शिक्षण संस्था बघितली, शिक्षण संस्थेचे ऑफिस बघितलं. काय समजलं हे माहिती नाही असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी जुना किस्सा सांगितला. पुणे लोकल बोर्डामध्ये (Pune Local board) आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात मी फक्त सहा दिवसाचा असताना देखील माझी आई मला घेऊन आल्याचे शरद पवार म्हणाले. पुण्यातील 'धायरेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान, धायरी' च्या रौप्य महोत्सवी सांगता समारंभात आयोजित कार्यक्रमात शरद पवार बोलत होते.


नेमकं काय म्हणाले शरद पवार?


पूर्वीच्या काळामध्ये जिल्हा परिषदा नव्हत्या. लोकल बोर्ड असायचं 1936 साली माझा जन्म व्हायच्या आधी चार वर्ष माझी आई स्कुल बोर्डावर निवडून आली होती. सबंध पुणे जिल्ह्यामध्ये शैक्षणिक संस्थेमध्ये निवडून आलेली एकमेव स्त्री होती. त्या वेळेला त्यांनी शैक्षणिक कामामध्ये लक्ष दिलं. कधी कधी मला सांगायला गंमत वाटते एक दिवशी पुणे लोकल बोर्डामध्ये-स्कूल बोर्डामध्ये काही नवीन उपक्रम हातामध्ये घेतला होता. माझी आई त्या वेळेला स्कूल बोर्डात-लोकल बोर्डात होती. तो कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा होता. शंकरराव मोरे त्या काळामध्ये अध्यक्ष होते. त्यांनी सगळ्या सभासदांना सांगितलं की, आपण शिक्षणामध्ये परिवर्तन करतोय आणि त्या सोहळ्याला प्रत्येकाने हजर राहायला पाहिजे. माझी आई सुद्धा हजर राहिली होती. त्याचे वैशिष्ट्य हे होते, ती हजर राहिली त्यावेळेला सहा दिवसांचं बाळ जन्मलेलं बरोबर घेऊन बारामतीमधून ती पुण्याला आली होती. तिला विचारलं की सहा दिवसांचं बाळ घेऊन तुम्ही येताय? माझ्या आईने सांगितलं की शिक्षणाचे महत्त्व काय हे आम्हाला कर्मवीर भाऊराव पाटलांनी शिकवलं, तसेच महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईंनी सुद्धा शिकवलं. म्हणून जर अतिशय लहान बालक जरी असलं तरी त्या बालकाला घेऊन मी या ठिकाणी आल्याचे त्यांनी सांगितले होते. तुम्हाला गंमत वाटेल की ते बालक म्हणजे दुसरे तिसरे कोणीही नसून मी होतो असं शरद पवार म्हणाले. माझ्या वयाच्या सहाव्या दिवशी मी शिक्षण संस्था बघितली, शिक्षण संस्थेचे ऑफिस बघितल्याचे ते म्हणाले. 


मला अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये काम करण्याची संधी मिळाली


मी कधी कधी विचार करतो की आज मी रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आहे. रयत शिक्षण संस्थेमध्ये चार लाख मुलं-मुली शिकतात. आज रयत शिक्षण संस्थेमध्ये 35 पेक्षा जास्त कॉलेजेस आहेत आणि 350 पेक्षा अधिक शाळा आज ज्ञानदानाचे काम करत आहेत. आज मी पुण्याच्या शाहू कॉलेजचा अध्यक्ष आहे, आज मी बारामतीला विद्या प्रतिष्ठान नावाची संस्था आहे जिथे 35000 मुलं-मुली शिकतात त्याचा मी अध्यक्ष आहे. मुंबईमध्ये मराठा मंडळ नावाची शिक्षण संस्था आहे ज्याच्या शाखा कोकणामध्ये आहेत, सोलापूर जिल्ह्यात आहेत, सांगली जिल्ह्यातील जतला आहेत त्याही जिल्ह्यांचा मी अध्यक्ष आहे. या अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये आज काम करण्याची संधी मला मिळाली. मला असं वाटतं की सहा दिवसांचा असताना आईने मला इथे आणून काही विचार शिकविले असतील ते मला माहित नाही पण त्याचा उपयोग या सगळ्या शैक्षणिक कामामध्ये माझ्यासारख्याला झाला. म्हणून मला इथे आजच्या कार्यक्रमाला यायला अतिशय आनंद आहे असे शरद पवार म्हणाले. 


केरळ राज्यात शिक्षणाचा मोठा विस्तार


आज मी देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये हिंडतो. दोन-तीन राज्य अशी आहेत की जिथे प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षण याच्यासाठी त्या राज्यामध्ये प्रचंड काम केलेले आहे. त्यामध्ये पहिला नंबर लागतो तो केरळचा. आज केरळ सारख्या राज्यामध्ये शिक्षणाचा विस्तार हा महाराष्ट्रापेक्षा सुद्धा अधिक झाल्याचे शरद पवार म्हणाले. त्याबरोबरच तामिळनाडूमध्येही हेच चित्र दिसतं, नॉर्थ ईस्टमध्ये नागालँड, अरुणाचल हा सगळा जो भाग आहे हिमालयाच्या पायथ्याशी त्या सगळ्या भागांमध्ये शिक्षणाची टक्केवारी जर बघितली तर 91 ते 92 टक्के मुलं मुली तिथे शिक्षणासाठी जातात, यशस्वी होतात आणि जगामध्ये आपल्या ज्ञानाचे कर्तुत्व दाखवण्याबद्दलची काळजी करतात. हे त्या ठिकाणी जर झालं तर आपण भाग्यवान आहोत महाराष्ट्रामध्ये सुद्धा तसे काम करणाऱ्या अनेक नेतृत्वाच्या प्रमुख नेत्यांची पिढी होऊन गेली असे शरद पवार म्हणाले. 


महत्वाच्या बातम्या:


मोठी बातमी : शरद पवारांकडून उद्याचा महाराष्ट्र बंद मागे, उद्धव ठाकरे लवकरच भूमिका जाहीर करणार