पुणे : जिल्ह्यात पावसाचा (Pune Rain) हाहाकार पाहायला मिळत आहे. सिंहगड रोड (Sinhgad Road) परिसरातील अनेक घरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून तुफान पाऊस सुरु असताना विजेचा शॉक (Electric Shock) लागून तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पुलाची वाडी (Pulachi Wadi) परिसरात घडली आहे. 


पुण्यात रात्रभर मुसळधार पाऊस (Pune Heavy Rain) कोसळत आहे. या पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले आहे. सिंहगड रस्त्यावरील (Sinhagad Road) अनेक सोसायट्यांमध्ये पाणी घुसले आहे. या ठिकाणी मदतीसाठी कोणतीही यंत्रणा आली नसल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. या पाण्यात अनेक लोक अडकलेले आहेत. त्यातच आता पुलाची वाडी परिसरातून दुर्दैवी घटना समोर आली आहे. 


अंडाभुर्जीचा स्टॉल वाचवण्यासाठी गेलेल्या तिघांचा शॉक लागल्याने अंत


रात्री तीन वाजेच्या सुमारास भिडे ब्रिज (Bhide Bridge) परिसरातील झेड ब्रिज खालील नदी पात्रात पाण्याची पातळी अचानक वाढली. या ब्रिज खाली अंडा भुर्जी स्टॉलवर काम करणारे तीन इसम अंडा भुर्जी स्टॉल सुरक्षित ठिकाणी हलवण्याकरता गेले होते. यावेळी त्यांना विजेचा शॉक लागला. त्यांना पहाटे पाच वाजता उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र  उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. अभिषेक अजय घाणेकर (25, रा. पुलाची वाडी, डेक्कन), आकाश विनायक माने (21, रा, पूलाची वाडी, डेक्कन) शिवा जिदबहादुर परिहार (18, नेपाळी कामगार) अशी मयतांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 


प्रशासनाचा ढिसाळ कारभार


याबाबत नागरिकांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले की, इतक्या मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरु असूनदेखील त्या परिसरातील लाईट सुरु होत्या. प्रशासनाने तेथील लाईट बंद करणे अपेक्षित होते. रात्रीतून कधीच पाण्याचा विसर्ग केला जात नाही. सकाळी विसर्ग केला जातो. परिसरातील तीन मुले आपला स्टॉल वाहून जाईल या भीतीपोटी स्टॉल वाचवण्यासाठी गेले होते. मात्र त्यांना शॉक लागल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाचा ढिसाळ कारभार सुरु आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Pune Rain: पुण्यात तुफान पाऊस, खडकवासला धरणातून वेगाने पाण्याचा विसर्ग, शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर


पुणेकरांनो सावधान! आज जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट, गरज असेल तरच बाहेर पडा, प्रशासनाचं आवाहन