Pune Railway News : चालत्या रेल्वेवर दगडफेक झाल्याची घटना घडली (Pune Crime) आहे. पुणे (pune) जिल्ह्यातील उरुळी कांचन येथे शुक्रवारी (25 नोव्हेंबर) रात्री ही घटना घडली आहे. गोंदियाहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या महाराष्ट्र एक्सप्रेसवर ही दगडफेक करण्यात आली आहे. या घटनेत रेल्वेच्या एका डब्याच्या खिडकीची काच फुटली आहे. काचा बंद असल्यामुळे सुदैवाने कोणताही प्रवासी जखमी झाला नाही. विदर्भातून पुण्यात येण्यासाठी अनेक प्रवाशांसाठी एक्स्प्रेस सोयीची आहे. त्यामुळे शेकडो प्रवासी या रेल्वेने प्रवास करतात. शुक्रवारी संध्याकाळी पुणे विभागात दाखल झाल्यानंतर या रेल्वेवर दगडफेक करण्यात आली.
ही घटना घडल्यानंतर तातडीने या घटनेची स्थानिक रेल्वे सुरक्षा पोलिसांनी दखल घेतली. दगडफेक झालेल्या ठिकाणाची पाहणी देखील केली. या पाहणीत मात्र पोलिसांच्या हाती काहीच सापडलं नाही. या प्रकाराबाबत एका प्रवाशाने रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली होती. दगडफेक झाल्याची माहिती दिली होती. रेल्वे पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
मागील आठवड्यात, पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या सिंहगड एक्सप्रेसवर दगडफेक करण्यात आली होती. लोणावळ्याजवळ ही घटना घडली होती. या दगडफेकी दरम्यान एका प्रवाशाच्या डोक्याला दगड लागल्याने प्रवासी जखमी झाला होता. त्या मुलावर रेल्वे स्थानकावर उपचार करण्यात आले. रेल्वे धावत असताना ठिकठिकाणी टोळक्यांकडून दगडफेकीच्या यापूर्वी अनेक घटना घडल्या आहेत. यात अनेक प्रवाशांना जखमी व्हावे लागले आहे. मात्र या घटना अद्यापपर्यंत थांबण्याचे नाव घेत नाहीत.यावर रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाय योजना अद्यापपर्यंत करण्यात आलेले नाही. रेल्वे स्थानकावर जखमी प्रवाशाला प्रथम उपचार करण्यात आले असून या घटनेबाबत रेल्वे पोलीस तपास करत आहेत. या टोळीने रेल्वेवर दगडफेक का केली? याचं कारण अद्याप समोर आलं नाही.
रेल्वेवर दगडफेकीत वाढ, ठोस उपाययोजना कधी?
मागील काही महिन्या पासून वेगवेगळ्या कारणामुळे रेल्वेवर दडगफेकीच्या घटना सातत्त्याने समोर येत आहेत. या घटनांमुळे प्रवाशांमध्येही भीतीचं वातावरण बघायला मिळत आहे. या घटनांमध्ये अनेकांना दुखापत देखील होता. अशा घटना थांबवण्यासाठी अनेकदा प्रवाशांकडून प्रयत्न केले जातात आणि स्थानिकांकडूही प्रयत्न केले जातात. मात्र रेल्वे प्रशासन प्रत्येक घटनेनंतर फक्त पाहणी करतात त्यावर ठोस उपाय काढत नाही किंवा अशा दगडफेक करणाऱ्या टोळीला किंवा आरोपींना पकडण्यात येत नसल्याचं प्रवासी आणि स्थानिकांचं मत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आणि पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत कारवाई करायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.