Rapido Pune : परवाना नसताना रॅपिडो नावाने बाईक टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या कंपनीसह अधिकाऱ्यांवर पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) मागील दोन महिन्यांपासून कंपनीचा पाठपुरावा करण्यात येत होता. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आलं आहे. कंपनीला ही सेवा बंद करण्याबाबत आरटीओने तीन वेळा नोटीस बजावली. त्यावर कंपनीने कोणतंही पाऊलल उचललं नव्हतं. अखेर आरटीओने पाठपुरावा केला त्यानंतर या कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


रॅपिडोविरोधात आरटीओने 28 ऑक्टोबरला तक्रार दिली होती. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत भोसले यांनी याबाबत फिर्याद दिली होती. त्यानुसार रॅपिडो बाईक टॅक्सी सेवा चालवणाऱ्या रोपन ट्रान्सपोर्टेशन सव्हिर्सेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे अधिकारी जगदीश पाटील आणि इतर अधिकाऱ्यांवर गुरुवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. जानेवारी 2021 पासून रॅपिडोची सेवा पुण्यात सुरु आहे. या सेवेबाबत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील रिक्षा संघटनांनी अनेकदा आंदोलने केली. तसेच आताही सोमवारपासून बेमुदत संप करण्याचा इशारा दिला आहे.


अनंत भोसले यांच्या तक्रारीनुसार, बेकायदा सेवा पुरवणाऱ्या रॅपिडो कंपनीला खासगी दुचाकी वाहनांचा प्रवासी वाहतुकीसाठी वापर करु नये, याबाबत यावर्षी 10 फेब्रुवारी, 3 ऑगस्ट आणि 20 ऑक्टोबरला पोस्टाने आणि जगदीश पाटील यांना ई-मेलद्वारे आणि प्रत्यक्ष अशा एकूण तीन नोटीस बजावण्यात आल्या. या नोटिशीनंतरही कंपनीने पुण्यात सेवा सुरुच ठेवली. यामुळे आतापर्यंत आरटीओने कंपनीच्या 609 दुचाकींवर कारवाई करुन दंड वसूल केला आहे. ही रक्कम जवळपास 50 लाखांपर्यंतची आहे. त्यानंतरही सेवा सुरुच असल्याने अखेर आरटीओकडून कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.


रिक्षा संप मागे घेणार नाही...
रॅपिडो कंपनीविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला असला तरी रिक्षा संघटना सोमवारच्या (ता. 28) बेमुदत संपावर ठाम आहेत. गुन्हा दाखल झाला असला तरी अॅप सुरु असल्याने दुचाकी सहज बुक करता येत आहे. त्यामुळे अॅप बंद होत नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याचा इशारा संघटनांनी दिला आहे. आम्ही सातत्याने आंदोलन करुनही आरटीओकडून या मुद्द्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. गुन्हा दाखल झाला असला तरी त्याचा उपयोग नाही. कारण अॅप सुरुच आहे. त्यामुळे सोमवारपासून सर्व संघटना संपात सहभागी होतील. बेकायदा अॅप सेवा बंद होईपर्यंत मागे हटणार नाही,  'बघतोय रिक्षावाला संघटने' चे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांनी सांगितलं आहे.