Pune Porsche Car Accident : पुण्यातील गर्भश्रीमंत बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालच्या मुलाने दारूच्या नशेत पुण्यातील कल्याणी नगर भागात दोघांना चिरडून मारले होते. यानंतर अल्पवयीन आरोपीला चोप देत पोलिसांच्या हवाली केले होते. हे प्रकरण येरवडा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यानंतर मध्यरात्रीच वडगाव शेरीचे अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे पोहोचले होते. सुनील टिंगरे थेट मध्यरात्रीच तत्परनेनं पोहोचल्याने यांचा या प्रकरणातील सहभागावरून सातत्याने उलटसुलट आरोप होत आहेत.  


वाचा : Pune Porsche Car Accident : घरातील सुनेला हात घातल्याची केस झाली अन् दोन भाऊ अधिकच सुडाला पेटले; पुण्यातील नेत्याने अग्रवाल फॅमिलीची कुंडलीच मांडली


आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाल्यानंतर आमदार सुनील टिंगरे यांनी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गेल्याचे मान्य केलं होतं. मात्र, कोणत्याही प्रकारे पोलीस कारवाईमध्ये हस्तक्षेप केला नसल्याचा दावा केला होता. या सर्व पार्श्वभूमीवर आज पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती दिली. त्याचबरोबर अग्रवाल प्रकरणात तपासाची अपडेट दिली. यावेळी आमदार सुनील टिंगरे मध्यरात्री पोलिस स्टेशनला आल्याचे अमितेश कुमार यांनी सांगितले. 



येरवडा पोलीस स्टेशनमध्ये मध्यरात्री सुनील टिंगरे आले होते


टिंगरे यांच्या संदर्भात बोलताना अमितेश कुमार यांनी थेट वक्तव्य केलं. ते म्हणाले की, होय येरवडा पोलीस स्टेशनमध्ये मध्यरात्री सुनील टिंगरे आले होते. मात्र, पोलिसांचे कारवाई ही मुद्द्यानेच झाली आहे. पोलिसांनी कारवाई नियमाने आणि कायदेशीर मार्गांनी केली आहे. त्यामुळे टिंगरे पोलिस स्टेशनला आले असले, तरी तपासाची दिशा बदलली हे संयुक्तिक नसल्याचं अमितेश कुमार यांनी म्हटले आहे. 


पोर्शे कारमध्ये चार जण होते


या प्रकरणामध्ये दोन एफआयआर दाखल करण्यात आल्याचेही पोलिस आयुक्तांनी सांगितले. या प्रकरणी पहिला एफआयआर सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणात केस आणखी मजबूत होण्यासाठी दोन ते तीन तासांनी आणखी काही कलम वाढवल्याचे अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले. कोणत्याही दबावाशिवाय कलमे वाढवण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार पबमध्ये अल्पवयीन आरोपीसह सात ते आठ जण होते. मात्र. पोर्शे कारमध्ये चार जण होते. यामध्ये अल्पवयीन आरोपी, ड्रायव्हर आणि दोन मित्र होते असेही त्यांनी सांगितले. उर्वरित तिघेजण जे होते त्यांचा या प्रकरणांमध्ये साक्षीदार म्हणून समावेश केला असल्याचं त्यांनी स्पष्ट केले. 


इतर महत्वाच्या बातम्या