Pune Porsche Car Accident : पुण्यातील कल्याणी नगरमध्ये दारू पिऊन मध्यरात्री भरधाव वेगात आलिशान पोर्शे कार चालवून दोन सॉफ्टवेअर इंजिनिअर्सना चिरडणाऱ्या अल्पवयीन वेदांत विशाल अग्रवालला अवघ्या काही तासांमध्ये जामिन मिळाल्याने पुण्यामध्ये संतापाची लाट उसळली आहे. पुणे पोलिसांची लक्तरे पुन्हा एकदा या घटनेंतर वेशीवर टांगली गेली आहेत. बिल्डर पुत्राला ज्या पद्धतीने जामीन मिळाला आणि जी शिक्षा मिळाली आहे त्यावरून सुद्धा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. 


मध्यरात्री अपघात घडल्यानंतर वेदांत अग्रवालला वाचवण्यासाठी बराच प्रयत्न झाला होता. इतकेच नव्हे तर वेदांत अगरवाल दारू पिऊनही त्याची वैद्यकीय चाचणी झाली नाही. हे प्रकरण मिटवण्यासाठी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये एका आमदाराने तळ ठोकला होता, असाही आरोप झाला होता. मात्र आता थेट नावासह आरोप करण्यात आला आहे.






अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे हे विशाल अग्रवाल यांच्याशी व्यावसायिक हितसंबंध असल्याने वेदांत अग्रवालच्या मुलाला वाचवण्यासाठी मध्यरात्री पोलिस स्टेशनमध्ये बसून होते, असा गंभीर आरोप पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्या विनिता देशमुख यांनी केला आहे. 


विनिता देशमुख यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले की, पुण्यातील कल्याणी नगरमधील अपघाताला कारणीभूत ठरलेल्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न आमदार सुनील टिंगरे यांनी केला आहे. सुनील टिंगरे हे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार असून जिथे हा प्रकार घडला ते पोलिस स्टेशन त्यांच्या मतदारसंघात येते. आरोपी मुलाच्या वडिलांचे आमदार सुनील टिंगरे यांच्यासोबत व्यवसायिक संबंध असल्याने मध्यरात्री येरवडा पोलिस स्टेशनमधे बसून होते, असे विनिता देशमुख यांनी म्हटलं आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या