पुणे : कल्याणीनगर येथे मे 2024 मध्ये झालेल्या बहुचर्चित ‘पोर्शे’ कार अपघातप्रकरणी आणखी एक गंभीर माहिती उघडकीस आली आहे. अपघातानंतर आरोपी अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या मित्रांच्या रक्तनमुना ससून रुग्णालयातच नव्हे, तर औंध येथील जिल्हा रुग्णालयातही बदलण्याचा प्रयत्न झाला होता, असा दावा सरकार पक्षाने पुणे सत्र न्यायालयात केला आहे. या संदर्भातील कागदपत्रे, डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे जबाब यांसह महत्त्वाचे पुरावे विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी मंगळवारी न्यायालयात सादर केले. या नवीन खुलाशामुळे प्रकरण आणखीच गंभीर व गुंतागुंतीचे झाले आहे.

Continues below advertisement

आरोपींचा नवा युक्तिवाद 

पोर्शे अपघात प्रकरणातील अल्पवयीन कारचालकाच्या वडिलांनी म्हणजेत विशाल अगरवाल यांनी आईच्या आजाराचे कारण देत न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर बचाव पक्षातर्फे ॲड. सुदीप पासबोला, ॲड. हृषीकेश गानू आणि ॲड. राजेश काळे यांनी युक्तिवाद करत आरोप फेटाळण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितले की, भारतीय दंड विधान व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत लावण्यात आलेली कलमे – कलम 109, कलम 7 व 7 अ – हे लागू होत नाहीत. तसेच बनावट दस्तावेज निर्मितीचा आरोपही अशक्त आहे, असा त्यांचा युक्तिवाद आहे.

पोलीस तपासात असं निष्पन्न झालं आहे की, आरोपी विशाल अगरवाल, त्यांची पत्नी शिवानी अगरवाल आणि सहकारी अरुणकुमार सिंग यांनी काही डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या संगनमताने, जेसीबी ऑपरेटर अतुल घटकांबळे याच्या माध्यमातून डॉ. श्रीहरी हाळनोर (ससूनच्या आपत्कालीन विभागाचे तत्कालीन प्रमुख) आणि डॉ. अजय तावरे (न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख) यांना लाच देऊन रक्तनमुना बदलण्याचा कट रचला होता.

Continues below advertisement

या प्रकरणातील एकूण 10 आरोपींविरोधात आरोप निश्चितीची प्रक्रिया सध्या सुरू असून, यासंबंधी पुढील सुनावणी 11 जुलै रोजी होणार आहे. या प्रकरणामुळे न्यायालयीन आणि वैद्यकीय यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, प्रकरणाच्या चौकशीसाठी आता अधिक खोलवर तपास होण्याची शक्यता आहे.

पोर्श हिट अँड रन प्रकरण नेमकं काय?

पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाच्या 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलानं दारुच्या नशेत भरधाव वेगानं आलिशान पोर्शे गाडीने दुचाकीला धडक दिली होती. यामध्ये दोन आयटी अभियंत्यांचा जागीच मृत्यू झाला. अनिश अवधिया (27 वर्षे) आणि अश्विनी कोष्टा अशी अपघातामध्ये जागीच मृत्यू झालेल्यांची नावे होती. पुण्यातील कल्याणीनगरमध्ये झालेल्या अपघातात पोर्शे गाडीचा वेग इतका भरधाव होता की अश्विनी कोस्टा या 15 फूट दूर फेकली गेली. 

त्यानंतर पोलिसांनी त्या अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलं. पण आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला बालन्याय मंडळासमोर उभं करण्यात आलं. बालन्याय मंडळाने त्या अल्पवयीन मुलाला 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची आणि इतर काही थातूरमातून शिक्षा दिल्या आणि जामीन मंजूर केला होता. 

कल्याणीनगर अपघात प्रकरणात पोर्शे कार चालक अल्पवयीन मुलाला घटनेच्या अवघ्या 15 तासात 300 शब्दांचा निबंध लेखनासह विविध अटी घालत जामीन मंजूर करण्यात आला होता. हा जामीन ज्यांनी दिला त्या बालन्याय मंडळाच्या दोन शासकीय सदस्यांवर शिस्तभांगाची कारवाई करण्याची शिफारस महिला आणि बालविकास विभागाने सरकारकडे केली होती. अल्पवयीन आरोपीच्या जामिनाच्या निर्णयावर देशभरातून तीव्र प्रक्रिया उमटल्या होत्या.