पुणे : सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) पुन्हा एकदा बरळले आहेत. त्यांनी नाव न घेता पवार कुटुंबीयांवर अत्यंत गलिच्छ भाषेत टीका केली. सासू ख्रिश्चन, नवरा ब्राह्मण, बाप मराठा अन् आई दुसरीच, पुण्यात असं एक कॉकटेल घर आहे अशा शब्दात गोपीचंद पडळकरांनी टीका केली. हे कुटुंबीय एकादशीच्या दिवशी मटण खाऊन दगडूशेठ गणपतीला जातं असंही ते म्हणाले. गोपीचंद पडळकर यांच्या या वक्तव्यावर आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
सांगलीतील ऋतुजा पाटील हत्या प्रकरणी पुण्यामध्ये हिंदुत्ववाद्यांनी मोर्चा काढला होता. या मोर्चामध्ये भाषण करत असताना गोपीचंद पडळकरांनी पवार कुटुंबीयांवर नाव न घेता टीका केली.
Gopichand Padalkar Speech : नेमकं काय म्हणाले गोपीचंद पडळकर?
गोपीचंद पडळकर म्हणाले की, "एका गटाचे लोक एका मोर्चामध्ये पुढे पुढे करत आहेत. ते घर पण तसंच आहे. संकष्टीच्या दिवशी उपवास असतो त्या दिवशी घरामध्ये मटण आणायचं. एकादशीच्या दिवशी चिकन आणायचं. एका मोर्चात एक गट पुढे-पुढे करतोय. ते घर पण तसंच आहे. त्या घरातील लोक एकादशीच्या दिवशी दगडू शेठ गणपतीला मटण खाऊन जातात. तुम्हाला माहिती आहे ते घर कोणतं आहे. तिची सासू खिश्चन आहे, नवरा ब्राह्मण आहे, बाप मराठा आहे आणि आई दुसरीच आहे. असं ते कॉकटेल कुटुंबीय आहे."
आमदार गोपीचंद पडळकरांनी केलेल्या या टीकेला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रशांत जगताप यांनी प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले की, "गोपीचंद पडळकर ही एक प्रवृत्ती आहे. त्यांनी पवार कुटुंबीयांबद्दल गलिच्छ भाषा वापरली. ज्यांची ग्रामपंचायतीमध्ये निवडून येण्याची लायकी नाही अशांना भाजपकडून पदं दिली जातात आणि विरोधी पक्षातील नेत्यांवर अशा शब्दात बोलायला लावलं जातं."
मंगळसूत्र चोरीच्या प्रकरणी गोपीचंद पडळकरांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. अशांची पवार कुटुंबीयांवर बोलण्याची लायकी नाही. येणाऱ्या काळात महाराष्ट्रातली जनता त्याला योग्य ते उत्तर देईल असं प्रशांत जगताप म्हणाले.
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी या आधीही पवार कुटुंबीयांबद्दल बोलताना अनेकदा गलिच्छ भाषा वापरली आहे. त्यावर सत्ताधारी नेत्यांकडून मात्र काही नियंत्रण आणलं जात नसल्याचं दिसून येतंय. आताही पडळकरांनी पवार कुटुंबीयांवर आक्षेपार्ह भाषा वापरून टीका केली आहे. त्यावरुन आता वाद होण्याची शक्यता आहे.