पुणे: पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज पुण्यात आहेत. पुण्यातील साखर संकुल येथे काही सहकार मंत्री बाबासाहेब पाटीलही यांच्यासोबत अजित पवारांची (Ajit Pawar) बैठक पार पडली आहे. साखर आयुक्त कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या सर्व प्रादेशिक कार्यालयाचे कामकाजाचा अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज (गुरूवारी) आढावा घेतला आहे. अजित पवार यांनी हवेली तालुक्यातील दोन साखर कारखाण्याबाबत देखील बैठका घेतल्या आहेत. 


 हवेली तालुक्यातील दोन्ही साखर कारखाने सुरू करण्यासाठी अजित पवारांनी बैठका घेतल्याची माहिती आहे. माजी आमदार अशोक पवार यांच्याकडे असलेल्या घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचा देखील समावेश आहे. तर दुसरा थेऊर येथील साखर कारखान्याबाबत बैठक पार पडल्याची माहिती आहे. शरद पवार गटाचे माजी आमदार अशोक पवारांच्या कारखान्यावर अजितदादाची प्रशासक नेमण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. अजित पवारांनी शिरूरच्या घोडगंगा सहकारी कारखान्याची बैठक लावली होती


माजी आमदार अशोक पवार यांची सत्ता असलेला घोडगंगा कारखाना अजूनही बंद आहे. कारखाना चालू करण्यासाठी विरोधी गट आक्रमक आहेत. माजी आमदार अशोक पवार यांचा मुलगा सध्या कारखान्याचा चेअरमन आहे. यावेळी बैठकीला अजित पवार गटाचे आमदार माऊली कटकेही उपस्थित होते. अजित पवार घोडगंगा बाबत नेमका काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


दरम्यान याआधी एनएसडीसीकडून काही कारखान्यांना कर्ज वाटप करण्यात आलं होतं, मात्र, अशोक पवारांच्या या कारखान्याला कर्ज न देता 'एनएसडीसी'कडे (NSDC) सादर केलेल्या कर्जाच्या फाईल मध्ये त्रुटी असल्याचं सांगितलं गेलं होतं, त्यानंतर अशोक पवारांनी अजित पवारांवर टीका देखील केली होती. मी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत राहिलो म्हणून माझ्यावर अन्याय करणार असाल तर जनता तुम्हाला माफ करणार नाही, केवळ विरोधी पक्षात आहे म्हणून निधी दिला जात नाही हे दुर्दैवी असल्याचे त्यांनी आधी म्हटलेलं होतं. 


हा कारखाना सध्या बंदच आहे, विधानसभा निवडणुकीत घोडगंगा कारखाना विरोधकांनी लक्ष्य केला होता, आता पुन्हा एकदा महायुतीचे सरकार सत्तेवर येताच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोडगंगा कारखाना रडारवर घेतल्याचे आता बोलले जात आहे.


अजित पवारांनी निवडणुकीआधी केली होती टीका


अशोक पवार यांनी स्वतःचा खासगी कारखाना चांगला चालवला. पण, घोडगंगा साखर कारखाना बंद पाडला. कारखाना अडचणीत असताना आपल्या अनुभवी नवख्या मुलाच्या ताब्यात देऊन त्याला अध्यक्ष केले. शिरूर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखाना हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. हा कारखाना बंद पडला असल्याने संचालक मंडळाला काही दिवस देतो. त्यानंतर मात्र मी सहकारी कायद्यानुसार नोटीस काढतो. हे संचालक मंडळ कारखाना चालविण्यास सक्षम नसल्याने प्रशासकाच्या ताब्यात द्यावे लागेल. मला शेवटी सभासदांचे हित महत्त्वाचे आहे. घोडगंगा कारखान्याच्या बाबतीत जी चूक झाली ती आगामी काळात सुधारू, असं अजित पवारांनी म्हटलं होतं.


पुण्यात अजित पवारांच्या बैठकीदरम्यान बत्तीगुल


उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुण्यातील साखर संकुल येथे साखर आयुक्त कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या सर्व प्रादेशिक कार्यालयाच्या कामकाजाचा आढावा घेणाऱ्या बैठकीला उपस्थिती दर्शवली. अजित पवार (Ajit Pawar) साखर संकुल कार्यालयात येताच काही सेकंद वीज गायब झाली. त्यामुळे उपस्थित अधिकाऱ्यांची पळापळ झाली. त्या अगोदर अजित पवार यांनी कार्यकर्त्यांची भेटीगाठी घेत नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे प्रकाशन केले. तर आणखी एका कार्यकर्त्याने घेतलेल्या नव्या गाडीचे पूजन देखील यावेळी अजित पवारांच्या हस्ते करण्यात आले.


बाबा आढाव यांनी उपोषण कधी सोडलं? 


यावेळी अजित पवारांनी (Ajit Pawar) बाबा आढाव यांनी उपोषण कधी सोडलं? असा प्रश्न कार्यकर्त्यांना विचारला, त्यावेळी एक कार्यकर्ता म्हणाला उद्धव ठाकरे आल्यानंतर बाबा आढाव यांनी उपोषण सोडलं. त्यावर अजितदादांच्या देहबोलीतून नाराजी व्यक्त झाल्याचं दिसून आले. तसेच यावेळी कार्यकर्त्यांना बोलताना, मला काम करू द्या. सकाळ सकाळ हे काय आल्या आल्या कामच करून देत नाही असंही ते कार्यकर्त्यांना म्हणाले.