Ravindra dhangekar : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एका कार्यक्रमात राज्याचं मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न व्यक्त केल्यानंतर आता कसबा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी देखील मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न व्यक्त केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.


आमदार रवींद्र धंगेकर यांनी सोमवारी करमाळा येथे काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी हे वक्तव्य केलं आहे. अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत त्यांना विचारलं असता ते म्हणाले की,  आमचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री होण्याची इच्छा प्रत्येकालाच असते आणि अजितदादा यांनी जी इच्छा व्यक्त केली आहे. प्रत्येकालाच मुख्यमंत्री होण्याची इच्छा असते, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देखील इच्छा आहे  मी देखील मुख्यमंत्री व्हावं पण मला माझी ताकद माहित आहे, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आणि इच्छा व्यक्त करण्यात काहीही गैर नाही असं देखील यावेळी धंगेकर म्हणाले.


चंद्रकांत पाटलांना ओपन चॅलेंज


पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना देखील यावेळी आमदार धंगेकर यांनी ओपन चॅलेंज दिलं आहे. ते म्हणाले की आमदार चंद्रकांत पाटील हे पुण्याचे आमदार असूनही त्यांना पुण्याबद्दल, पुणेकर नागरिक यांच्याबद्दल काहीही माहीत नाही. ते एक पाहुणे म्हणून आले होते आणि पाहुण्यांना आता जाण्याची वेळ आली आहे. तसेच त्यांना माझं ओपन चॅलेंज आहे की त्यांनी सांगावं तिथं मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढविणार आणि तिथून जिंकून देखील येणार असल्याचं यावेळी धंगेकर यांनी सांगितलं.


धंगेकर आणि चंद्रकांत पाटलांमधील दोषारोप संपेनाच...


पुण्याच्या पोटनिवडणुकीपासून पुण्याचे पालकमंत्री आणि कसब्याचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांच्यातील वाद आणि आरोप प्रत्यारोप काही संपायचं नाव घेत नाही आहे. यावेळी तर धंगेकर यांनी थेट चंद्रकांत पाटलांना कोल्हापूरात परत पाठवण्याची भाषा केली आहे. यापूर्वीही त्यांनी चंद्रकांत पाटलांवर अनेकदा टीका केली आहे. त्यांच्या समर्थकांनीदेखील गाण्यातून चंद्रकांत पाटलांना डिवचलं होतं. दोघांमधील वाद पाहून धंगेकरांच्या चाहत्याने थेट गाण्यातून चंद्रकांत पाटलांना टोला लगावला होता. चंपाबाई धंगेकरला जीव थोडा लाव, असं या गाण्याचे बोल होते. हे गाणं कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड व्हायरल झालं होतं आणि आता पाटलांना थेट कोल्हापूरात परत पाठवण्याची भाषा केल्याने चंद्रकांत पाटील यावर काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.