पुणे : पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकीच्या नियोजनावरून यंदा प्रशासनाचा आणि पोलिसांचा गोंधळ समोर आला आहे. एकीकडे पोलिसांनी संध्याकाळी पाच वाजताच मिरवणूक पार पडल्याचं जाहीर केलं आणि आनंद व्यक्त करण्यासाठी डीजेवर ठेका देखील धरला. दुसरीकडे मात्र अग्निशमन दलाचे जवान शेवटच्या गणपतीला निरोप देण्याची वाट बघत होते. शेवटी रात्री आठ वाजून सात मिनिटांनी शेवटच्या गणपतीचे विसर्जन झालं. त्यामुळे पुणे पोलिसांनी ही मिरवणूक गुंडाळल्याचं स्पष्ट झालं.
पुण्यात तब्बल 36 तासानंतर गणपती विसर्जन मिरवणुका पार पडल्या. गेल्या वर्षीचा 30 तासांचा विक्रम यावर्षी मोडीत निघाला. त्यामुळे कमी वेळेत मिरवणूक पार पाडण्याचे पुणे पोलिसांचे प्रयत्न पुन्हा निकामी ठरलेत का? तसंच पोलिसांचं सुक्ष्म नियोजनही फसलं का? असे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत.
पोलिसांचा सुक्ष्म नियोजन केल्याचा दावा फोल
पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकीचे नियोजनावरून पुणे पोलिसांवर बरीच चर्चा झाली, वाद रंगले. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सूक्ष्म नियोजन केल्याचा दावा केला. मात्र पुण्यातील यावर्षीची विसर्जन मिरवणूक यंदा 36 तास चालल्याचं स्पष्ट झालं.
मिरवणूक संपल्याचं तीन तास आधीच जाहीर
अनेक मंडळांच्या गणपतीचे विसर्जन बाकी असतानाच विसर्जन मिरवणूक संपल्याची घोषणा पुणे पोलिसांनी केली. त्यानंतर पोलिसांनी आनंद व्यक्त करत डॉल्बीवर ठेकाही धरला. मात्र यानंतर देखील अनेक मंडळाचे गणेश विसर्जन झालं.
अग्निशमन दलाचे जवानांनी घाट सोडला नाही
पुण्यातील विसर्जन मिरवणूक संपल्याचा दावा केला आणि सगळ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे धन्यवाद मानण्यात आले. मात्र अग्निशमन दलाचे जवान शेवटच्या गणपतीला निरोप देण्याची वाट बघत होते. कारण दरवर्षी सगळं विसर्जन झालं असं पोलिसांनी जाहीर केल्यानंतर कोणतेही मंडळ विसर्जनासाठी येत नाही. मात्र यावर्षी पोलिसांची प्रेस झाल्यानंतरही काही मंडळ विसर्जनासाठी येत होते.
पोलिसांनी असं का केलं?
महत्वाचं म्हणजे शेवटचे गणपती मंडळ अमरज्योत हे मंडळ आल्यांनतर मिरवणूक संपते. ते मंडळ दाखल व्हायच्या आधी मिरवणूक संपली असं जाहीर झालं. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी घाट सोडला नाही. शेवट अमरज्योत तरुण गणपती मंडळाच्या बाप्पाच विसर्जन झालं आणि पुण्यातल्या शेवटच्या बाप्पाला निरोप दिला केला. पोलिसांनी या वेळी आधीच अस का केलं? असा प्रश्न या जवानानही पडला.
सायंकाळी पाच वाजता पुणे पोलिसांनी विसर्जन मिरवणूक संपल्याचं जाहीर केलं. त्यानंतर रात्री आठ वाजून सात मिनिटांनी पुण्यातला शेवटचा, म्हणजेच अमरज्योत तरुण मंडळ या गणपती मंडळाचं विसर्जन झालं. त्यामुळे पुणे पोलिसांनी विसर्जन मिरवणूक गुंडाळली हे यातून स्पष्ट झाले.