पुणे : आंदेकर आणि कोमकर या दोन टोळ्यांमध्ये असलेल्या वादात वनराज आंदेकरचा भाचा आयुष कोमकरची हत्या झाली. पण ही हत्या होईल असा अंदाज पोलिसांना नव्हता अशी माहिती समोर आली आहे. याबाबत खुद्द पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कबुली दिली. यापुढे गुन्हेगारांच्या सात पिढ्या लक्षात ठेवतील अशी कारवाई करणार असा इशाराही पोलीस आयुक्तांनी दिला.

गणपती विसर्जनाच्या आदल्या रात्री पुण्यातील नाना चौकात 20 वर्षाच्या आयुष गणेश कोमकरची अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली. आयुष कोमकरच्या हत्येला वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला म्हणून पाहिलं जात आहे. या प्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडूअण्णा आंदेकर याच्यासह अकरा जणांविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात मकोकाअंतर्गत कारवाई करणार असल्याचं पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं.

चुकीला माफी नाही

पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, "वादातून स्वतःच्या नातवाची किंवा बहिणीच्या मुलाची हत्या केली जाईल असा अंदाज पोलिसांना नव्हता. आता गुन्हेगारांच्या सात पिढ्या लक्षात ठेवतील अशी त्यांच्यावर कारवाई करणार. कोणत्याच गँगला आणि गँगस्टरच्या चुकीला माफी नाही."

बंडू आंदेकरवर गुन्हा दाखल

पुण्यातील 20 वर्षीय आयुष कोमकर याची हत्या ही टोळी युद्धातून झाली असून याप्रकरणी पुणे पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वनराजच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आयुषची हत्या

पुण्यात सर्वत्र गणेश विसर्जन मिरवणुकीची तयारी सुरू असताना त्याच्या आदल्या रात्री आयुष कोमकरची हत्या करण्यात आली. आयुष कोमकर क्लासवरून परत आल्यानंतर बिल्डिंगच्या खाली त्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

गेल्या वर्षी, 1 सप्टेंबर 2024 रोजी राष्ट्रवादीचा नगरसेवक वनराज आंदेकरची हत्या झाली होती. या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी संजीवनी कोमकर, पती जयंत कोमकर आणि तिचा दीर गणेश कोमकर सध्या तुरुंगात आहेत. त्या हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर गँगने आयुष कोमकरची हत्या केली.

या आधी हत्येचा प्लॅन फसला

वनराज आंदेकरच्या हत्येचा एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने प्लॅन केला होता. त्यांनी कोमकर टोळीमधील काही लोकांची रेकीही केल्याचं समोर आलं. यासंदर्भात गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी आंदेकर गँगमधील गुंडांना अटक केली आणि त्यांचा प्लॅन फसला. पण त्याच्या चारच दिवसानंतर आंदेकर गँगकडून आयुष कोमकरची हत्या करण्यात आली.

ही बातमी वाचा: