कसा होणार तपास वर्ग
केंद्रीय गृहमंत्रालय महाराष्ट्र गृहमंत्रालायाला कळवणार. महाराष्ट्र राज्य अतिरिक्त सचिव गृह हे पोलिस महासंचालक कार्यालयाला आदेश देणार त्यानंतर पोलिस महासंचालक हे पुणे पोलिस आयुक्तांना आदेश देतील. या पद्धतीने प्रक्रिया पार पडली नाही तर, एनआयए कोर्टच्या आदेशानुसार वाॅरंट घेऊन पुण्याच्या सत्र न्यायालयासमोर अधिकारी हजर राहतील. आरोपी आणि गुन्हा वर्ग करायचे परवानगी मागतील आणि न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा आणि आरोपी वर्ग केले जातील. या प्रकरणात आरोपीचे वकील आक्षेप घेऊ शकतात त्यावर ही सुनावणी होऊन निर्णय होऊ शकतो.
एल्गार प्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोपवण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवारांनी केली होती. त्यानंतर 25 जानेवारीला केंद्र सरकारनं हा तपास एनआयएकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शरद पवार यांच्यासह राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती.