पुणे : सह्याद्रीच्या कुशीतील पाच किल्ल्यांवर पाच वर्षीय चिमुरडीने तिरंगा फडकवला. हा अनोखा विक्रम तिने प्रजासत्ताक दिनाला प्रस्थापित केला आहे. हर्षिती भोईर असं या चिमुकल्या गिर्यारोहकाचे नाव आहे. उरणच्या भेंडखळ इथल्या हर्षितीने लोणावळ्यालगतच्या पाच किल्ल्यांवर ही किमया साधली. पाच वर्षीय चिमुकले आपापल्या शाळेत जेव्हा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात व्यस्त होते, तेव्हा हर्षिती मात्र इतिहास घडवण्यासाठी लोणावळ्यात दाखल झाली होती.
भोईर दाम्पत्य पहाटे साडे पाच वाजता हर्षितीला घेऊन श्रीवर्धन किल्ल्याच्या पायथ्याला पोहोचले आणि तिथून पाच किल्ले सर करण्याचा श्रीगणेशा केला. अंधाराच्या काळोखातच हर्षितीने हे आव्हान उराशी घेतलं अन् सूर्योदयाच्या साक्षीने श्रीवर्धन किल्ल्यावर तिरंगा फडकवला. दुसऱ्या म्हणजे मनोरंजन किल्ल्यावर मात्र दगडात पाय अडकला अन् ती खाली पडली. पोटाला आणि मांडीला इजा झाली. पण इतिहास घडवण्याच्या संकल्पाने तिला थांबू दिलं नाही. जिद्द, चिकाटी आणि इच्छाशक्तीच्या जोरावर तिने आई-वडिलांना बळ दिले आणि पुढे मोहीम सुरु ठेवली.
मग काय जखमी अवस्थेतच अनेक अडथळ्यांना भेदत, या चिमुरडीने मनोरंजननंतर विसापूर, लोहगड आणि तिकोना किल्ले सर केले. पहाटे साडे पाच वाजता सुरु केलेली मोहीम 11 तास 40 मिनिटानंतर हर्षितीने फत्ते केली. बरं एका किल्ल्यापासून दुसऱ्या किल्ल्याला पोहचण्यासाठी लागणाऱ्या प्रवासाचा वेळ सोडला तर केवळ आठ तासात हर्षितीने ही किमया साधली.
सर्वात कमी वयातील गिर्यारोहक म्हणून हर्षितीच्या पराक्रमाकडे पाहिलं जात आहे. म्हणूनच वर्ल्ड बुक, आशिया बुक आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये याची नोंद होणार आहे. भोईर दाम्पत्याने दोन वर्षांपूर्वी हर्षितीला पहिला ट्रेक घडवला. गेल्या जूनमध्ये तिने कळसूबाईचं आव्हान पेललं, कलावंतीण दुर्गा ही लीलया पार केलं. आजवर तेरा किल्ल्यांची भ्रमंती करणाऱ्या हर्षिती पुढे पाच किल्ले एकाच दिवशी सर करण्याचं आव्हान आई-वडिलांनी ठेवलं होतं. यासाठी दोन महिन्यांपासून सराव सुरु होता. पहिल्यांदा एकाच दिवशी दोन तर काही दिवसांनी तीन किल्ल्यांची यशस्वी चढाई हर्षितीने केली. तिची ही क्षमता पाहून तिच्या आई-वडिलांनी 26 जानेवारी दिवशी हा इतिहास घडवला.
प्रजासत्ताक दिनी पाच किल्ल्यांवर तिरंगा फडकवला, पाच वर्षीय हर्षितीने इतिहास घडवला!
नाजिम मुल्ला, एबीपी माझा
Updated at:
27 Jan 2020 03:18 PM (IST)
रायगड जिल्ह्यातील उरणच्या भेंडखळ इथल्या हर्षितीने इतिहास घडवला आहे. सर्वात कमी वयातील गिर्यारोहक म्हणून तिच्या पराक्रमाकडे पाहिलं जात आहे. म्हणूनच वर्ल्ड बुक, आशिया बुक आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये याची नोंद होणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -