पुणे : एल्गार परिषदेच्या आयोजनामागे माओवादी संबंध असल्याप्रकरणी पत्र-मेलसह अनेक महत्वाचे पुरावे मिळाले असून एल्गार परिषदेसाठी कबीर कला मंच, सीपीआय माओवाद्यांनी निधी पुरवला असल्याची माहिती पुण्याचे पोलिस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांनी दिली. आरोपींचे काश्मिरातील फुटीरतावाद्यांशी संबंध असल्याचा दावाही पोलिसांनी केला.


सरकारविरोधी कृत्य करण्याच्या हालचाली सुरु असल्याचे पुरावे आढळले असून कायदा राजवट उलथून टाकण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यासंबंधीचा ठराव बैठकीत संमत करण्यात आला होता. बंदी घातलेल्या माओवादी संघटनेच्या कटात या पाच आरोपींचा सहभाग असल्याचा स्पष्ट पुरावा हाती लागल्याचंही पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. एल्गार परिषदेच्या आयोजन प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे

विद्यार्थ्यांना भडकवणे, शस्त्र जमा करणे, दहशतवादी कृत्यात सहभाग असल्याचं स्पष्ट झालं आहे. विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या घातपात करण्याचा कट असल्याचंही आढळून आलं. लॅपटॉप, हार्डडिस्कसह अनेक साहित्य आणि पुरावे मिळाले आहेत. कबीर कला मंचाने पैसे पुरवले असून देशातील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ला करण्याची तयारी सुरु केली असल्याचं तपासात पुढे आलं, अशी माहिती पोलिस उपायुक्तांनी दिली.

एल्गार परिषद : नक्षली कनेक्शनप्रकरणी पाच जणांना अटक

एल्गार परिषदेच्या नक्षली संबंधांच्या आरोपात अटक झालेल्या पाच जणांना सर्वोच्च न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावून आरोपींना अटक करण्याऐवजी नजरकैदेत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 6 सप्टेंबरला होणार आहे.

छापा आणि अटकसत्र

पुणे पोलिसांनी 28 ऑगस्ट रोजी देशातील चार राज्यातील विविध शहरांमध्ये छापा टाकून सुधा भारद्वाज, गौतम नवलखा, अरुण फरेरा, वरनॉन गोन्साल्वीस आणि वरवर राव यांना अटक केली होती.