पुणे : पुण्यात शिक्षणासाठी मदत करण्याच्या बहाण्याने एका मौलवीने मुंबईत राहणाऱ्या एका तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. दत्तवाडी पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून 50 वर्षीय मौलवीला अटक करण्यात आली आहे.


मुंबईतील तरुणीला पुण्यात उच्च शिक्षणासाठी मदत करतो, असं या मौलवीने सांगितलं होतं. हा मौलवी मुंबईत तरुणीच्या घराशेजारी येत असे. यादरम्यान त्याची तरुणीशी ओळख झाली. तरुणीने या मौलवीला गुरु मानलं होतं. या तरुणीला बारावीनंतर उच्च शिक्षणासाठी पुण्याला जायचं होतं. त्यामुळे पुण्यात मुलींचं हॉस्टेल पाहा, असं तिच्या कुटुंबीयांनी मौलवीला सांगितलं होतं.

परंतु हॉस्टेल उपलब्ध नसल्याने पुण्यातील हडपसर इथे माझ्या घरात राहता येईल, असं मौलवीने तिच्या कुटुंबीयांना सांगितलं. त्यामुळे तरुणी हडपसरमध्ये मौलवीच्या घरी राहू लागली. मौलवी, त्याची पत्नी आणि तरुणी काही दिवस एकत्र राहात होते.

एक दिवस मौलवीने त्याची पत्नी बाहेर गेल्यावर या तरुणीचे आक्षेपार्ह फोटो काढले. तसंच तिच्यावर अतिप्रसंग केला. याशिवाय मुंबईतही वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार केले. संबंधित प्रकार कोणाला सांगितला तर आई-वडिलांना ठार करेन, अशी धमकीही दिली. मौलवीच्या धमकीमुळे ही तरुणी शांत राहिली. मात्र मुंबईत परतल्यावर तरुणीने संपूर्ण प्रकार आई-वडिलांना सांगितला. या तक्रारीची दखल घेत मौलवीविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.