पुणे: गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात (Pune) मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढली आहे. या गुन्हेगारीवरती वचक बसवण्यासाठी आणि शहरात शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी आता पोलिस अलर्ट मोडवरती आले आहेत. आता शहरामध्ये गुन्हेगारी संपवण्यासाठी पोलीस आयुक्तांनी मोठा निर्णय घेतला आहे.
'कॉप 24' हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरु
पुणे शहरात पोलिसांचे अस्तित्व अधिक दृढ करण्यासाठी आणि नागरिकांना तातडीने मदत पुरवण्यासाठी 'कॉप 24' हा महत्त्वाकांक्षी उपक्रम पुणे पोलिसांनी सुरु केला आहे. या उपक्रमांतर्गत 726 पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक केली असून, सध्या या कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण दिले जात आहे. लवकरच त्यांच्या सेवेची सुरुवात होईल, ज्यामुळे पुणेकरांना 24 तास गस्त घालणाऱ्या पोलिसांची मदत मिळणार आहे.
पूर्वी राबवल्या गेलेल्या 'बीट मार्शल' योजनेत प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन पोलिस कर्मचारी गस्त घालत होते. परंतु, त्यांना इतर कामेही दिली जात होती, ज्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत होता. त्यामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी 'कॉप 24' उपक्रम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे, 726 पोलिस कर्मचारी केवळ गस्त घालण्याचे काम करतील, आणि ते गुन्हे शाखेच्या नियंत्रणाखाली कार्य करतील.
'कॉप 24' उपक्रम अंतर्गत पोलिस गस्त घालतील, घटनास्थळी तत्काळ दाखल होणार आहेत आणि शहरात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्यास मदत करणार आहेत. या उपक्रमात सहभागी पोलिस कर्मचारी वेगळ्या वर्दीमध्ये दिसणार आहेत. प्रायोगिक तत्त्वावर सुरु होणाऱ्या या उपक्रमाचे नंतर दैनंदिन कामकाजात रूपांतर केले जाणार आहे.
अमितेशकुमार यांनी स्पष्ट केले की, 'कॉप 24' अंतर्गत पोलिस कर्मचारी स्थानिक पोलिस ठाण्याच्या दैनंदिन कामांपासून मुक्त असतील, आणि त्यांना फक्त गस्त घालण्याचं कार्य दिलं जाईल. यामुळे पुणे शहरातील पोलिसांची कार्यक्षमता वाढेल, आणि पुणेकरांना एक सुरक्षित शहर मिळेल. 'कॉप 24' उपक्रमामुळे पुणे शहरात पोलिसांचा अहोरात्र पहारा मिळेल, तसेच गुन्हेगारीवर चाप बसविण्यात मदत होईल. पुणेकरांना भविष्यात आणखी सुरक्षित वाटेल, अशी अपेक्षा आहे.