पुणे : बनावट कागदपत्रांच्या आधारे जामीन मिळवून देणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. शिवाजीनगरसह वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करून सात गुन्हे दाखल करत 37 जणांना अटक करण्यात आली आहे.यामध्ये 31 पुरूष व सात महिलांचा समावेश आहे. या टोळीने साधारण आतापर्यंत 25 हजारांपेक्षा जास्त आरोपींना जामीन मिळवून दिला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांना आहे.


पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. यातील एका आरोपीने आतापर्यंत कमीत-कमी सातशे ते आठशे गुन्हेगारांना बनावट कागदपत्राच्या आधारे जामीन मिळवून दिला आहे. या आरोपींकडून बनावट आधारकार्ड, वेतन स्लिप, रेशनकार्ड, सातबारा उतारा, बनावट स्टँप, फोटो, वेगवेगळ्या कंपनीचे ओळखपत्र अशी कागदपत्रे जप्त करण्यात आली आहे. पोलिसांना मिळलेल्या माहितीनुसार शहरातील विविध कोर्टात आरोपींना जामीन देण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करणारी टोळी कार्यरत आहे. ही टोळी शिवाजीनगर,लष्कर, खडकी,वडगाव मावळसह विविध कोर्टात ही कागदपत्रे सादर करून आरोपींना जामीन मिळवून देतात.त्यानुसार दोन पोलिस निरीक्षक आणि 27 प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक, 12 कर्मचारी यांची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. शिवाजीनगर कोर्टाच्या गेट क्रमांक चारजवळ व इतर ठिकाणी एकाच वेळी मंगळवारी छापा टाकण्यात आला. या सर्व आरोपींना पकडण्यात आले.


गेल्या दोन वर्षापासून हे आरोपी अशा प्रकारचे उद्योग करत आहेत. गेल्या वर्षी पुणे पोलिसांनी अशीच एक टोळी पकडली होती. त्यापैकी चार ते पाच आरोपींनी जामीनावर सुटल्यानंतर पुन्हा हाच उद्योग सुरू केल्याचे समोर आले आहे. सध्या तरी या चार ते पाच टोळ्या अशा पद्धतीने काम करत असल्याचे समोर आले आहे. या टोळींचा मुख्य सुत्रधार कोण आहे, याचा शोध सुरू आहे. चोरी, जबरी चोरी, घरफोडी, दरोडा आणि पॉस्को सारख्या गंभीर गुन्ह्यात अटक झालेल्या आरोपींना जामीन मिळवून देण्यासाठी बोगस कागदपत्रे तयार याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.या गुन्ह्याचा एकत्रित तपास सहायक पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली सुरू राहणार आहे. त्यामुळे यामध्ये अजून मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.