पुणे : पुण्यात पुन्हा एकदा गव्याचं दर्शन झालं आहे. बावधन परिसरात हा गवा आढळला आहे. पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गालगत केंद्र सरकारची हाय एनर्जी मटेरियल लॅबोरेटरी अर्थात HEMRL नावाची संस्था आहे. हा गवा सध्या या संस्थेची कंपाऊंड वॉल आणि महामार्ग यांच्या मध्ये असलेल्या झाडीमधे आहे. HEMRL संस्थेच्या पलिकडे टेकडी आणि दाट झाडी आहे. या गव्याला पकडण्याऐवजी त्याला पुन्हा दाट झाडीमध्ये घालवून देण्याचा वनविभागाचा विचार सुरु आहे.


काही वेळापूर्वी कम्पाऊंड वॉलच्या शेजारी, अगदी महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहनांना दिसणारा गवा आजूबाजूला हालचाल वाढल्याने दाट झाडीमध्ये गेला आहे. पण सध्या जिथे हा गवा आहे ती अतिशय चिंचोळी जागा आहे. महामार्ग आणि कंपाऊंड वॉल यांच्यामध्ये असलेल्या जागेमध्येच त्याचा वावर आहे आणि त्याच्यावर याच ठिकाणी नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. वनविभागाचे त्यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत.


पुण्यातील कोथरूडमध्ये शिरलेल्या रानगव्याचा रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान मृत्यू, लोकांच्या गोंधळामुळे मृत्यू झाल्याचा वनविभागाचा दावा


दोन आठवड्यांपूर्वी (8 डिसेंबर) पुण्यातील कोथरुड भागात सकाळी रानगवा आढळून आला होता. त्यानंतर या गव्याला बघण्यासाठी आणि त्याचे फोटो आणि व्हिडीओ हातातील मोबाईल कॅमेऱ्यात टिपण्यासाठी लोकांची जी गर्दी उसळली त्यामुळे हा गवा बिथरला आणि सैरावैरा पाळायला लागला. अनेक तासांच्या प्रयत्नानंतर या गव्याला पकडण्यात यश आलं खरं पण या सगळ्या गोंधळात गव्याचा मात्र मृत्यू झाला.


लोकांनी जो गोंधळ केला, या गव्याचा जो पाठलाग केला त्यामुळे या गव्याच्या शरीराचं तापमान वाढलं आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा दावा वनविभागाकडून करण्यात आला. उपवनसरंक्षक राहुल पाटील यांच्या मते गव्याला ट्रँक्विलाइज करण्यासाठी इंजेक्शन दिल्यानंतर तो बेशुद्ध होईपर्यंत काही वेळ थांबावं लागतं. परंतु इथे हा गवा बिथरल्याने सतत पळत होता आणि त्यामुळे त्याच्या शरीराचं तापमान वाढून त्याचा मृत्यू झाला.


Rangava dies | स्पेशल रिपोर्ट | माणसांच्या जंगलात हरवलेल्या गव्याचा तडफडून मृत्यू.. कोथरूडमधील घटना