पुणे : पुण्याच्या मार्केटयार्ड परिसरात जवळपास महिन्याभरापूर्वी ‘धूम स्टाईल’ने पेट्रोलपंपाची रोकड लंपास करणाऱ्या आरोपींना गुन्हे शाखेने अटक केले आहे. पेट्रोलपंप मालक अजय परदेशींचे 27 लाख 59 हजार रुपये चोरट्यांनी लुटले होते.


घटना काय घडली होती?

गेल्या महिन्यात 26 मार्च रोजी मार्केटयार्ड परिसरातील पेट्रोलपंपाचे मालक नेहमीप्रमाणे इतर पेट्रोलपंपांची रोख रक्कम बँकेत भरणा करण्यासाठी बिबवेवडी कोंढवा रोड येथून एसबीआय एटीएम समोरील रस्त्याने चारचाकी वाहनातून जात होते. त्यावेळी अज्ञात व्यक्तींनी कारच्या समोर सायकल आडवी घालून धारदार शस्त्रांचा धाक दाखवून जबरदस्तीने कारचा दरवाजा उघडण्यास सांगितला आणि 27 लाख 59 हजार रुपयांची रक्कम लुटली.

या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता. तक्रारदाराने दिलेली माहिती आणि सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करुन आरोपींना एका महिन्याच्या आत आरोपीना गजाआड केलं.

पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आहद अन्वर सैयद, साकीब मेहबूब चौधरी, तौसिफ उर्फ मोसीन जमीर सैयद, सूरज उर्फ मोटा उर्फ दस्तगीर, जमीर अहमद हुसेन सैयद यांना अटक करण्यात आली आहे.

या गुन्ह्यातील मुद्देमाल 24 लाख 12 हजार 150 रुपये आणि चार चाकी गाडी जप्त करण्यात आली आहे. यातील आरोपींवर अगोदरही गुन्हे दाखल आहेत. यासंदर्भात अजून तपास सुरु आहे.