Pune Organ Transplant : 19 वर्षीय तरुणाच्या अवयवदानातून (Pune Organ Transplant) पाच रुग्णांना नवजीवन मिळाले आहे. पिंपरीच्या डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये अवयवदान आणि प्रत्यारोपण यशस्वीरित्या पार पडलं आहे. त्यासाठी एकूण 20 डॉक्टर्स व 25 पॅरामेडिकल स्टाफने परिश्रम घेतले. फलटण परिसरात रस्त्यावर झालेल्या अपघातात 19 वर्षीय तरुणाच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. त्यांच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्यामुळे उपचारांसाठी पिंपरीच्या डॉ. डी. वाय पाटील वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तातडीने उपचार सुरु केले होते. डॉक्टरांनी आठ दिवस त्याचे प्राण वाचविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र दुर्देवाने रुग्णाने उपचारांना प्रतिसाद दिला नाही. अखेर उपचारादरम्यान त्यांना मृत  मेंदू (brain dead) घोषित करण्यात आले होते.                  


कुटुंबाचा धाडसी निर्णय...



मानवी प्रत्यारोपण कायद्यातील तरतुदी नुसार रुग्णाच्या कुटुंबियांना अवयवदानाविषयी रुग्णालयातील अवयवदान आणि प्रत्यारोपण विभागाच्या समन्वयक यांनी समुपदेशन केले. रुग्णाच्या नातेवाईकांच्या सर्व शंकांचे निरसन करण्यात आले. कुटुंबावर कोसळलेल्या दुःखाचा आघात बाजूला सारून अवयवदानाच्या केलेल्या आवाहनाला त्याची आई आणि त्याचा 22 वर्षीय मोठा भाऊ यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. या धाडसी निर्णयामुळे पाच जणांना नवजीवन मिळाले. विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीच्या नियमानुसार आणि प्रतीक्षा यादीप्रमाणे  हृदय, फुप्फुस, स्वादुपिंड,  यकृत, दोन मूत्रपिंड, हे अवयव गरजू रुग्णांवर प्रत्यारोपित करण्यात आले. त्यासाठी एकूण 20 डॉक्टर्स व 25 पॅरामेडिकल स्टाफने परिश्रम घेतले. 


पाच जणांना नवजीवन...


त्यात 52 वर्षीय पुरुषावर हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. 39 वर्षीय महिलेवर फुफ्फुस प्रत्यारोपण केले आणि  53 वर्षीय पुरुषाला यकृत तर 35 वर्षीय पुरुषाला एक मूत्रपिंड आणि स्वादूपींड प्रत्यारोपित करण्यात आले. या सर्व शस्त्रक्रिया डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात यशस्वीरित्या पूर्ण झाल्या तसेच  दुसरे मूत्रपिंड सोलापूर येथील रुग्णालयात 47 वर्षीय पुरुषावर प्रत्यारोपित केले.  


कुटुंबियांचे मानले आभार...


आमच्या परिवारातील एक सदस्य गेला हा आमच्या साठी फार मोठा धक्का आहे  पण जाताना गरजवंत पाच व्यक्तींना नव जीवन दिले हे फार महान कार्य आज घडले तो आज या पाच जणांमध्ये जीवंत आहे त्याचे जीवन इतरांसाठी वरदान ठरले, अशी भावना मोठ्या भावाने व्यक्त केली. कुटुंबीयांनी घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे आज अनेकांना नवजीवन मिळालं आहे. अनेकांनी या कुटुंबियांचे आभार मानले आहेत.