राणेंकडे रिमोट कंट्रोल, तेच विरोधीपक्षनेता ठरवणार : नितेश राणे
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे | 24 Sep 2017 01:27 PM (IST)
विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय नारायण राणेंवर अवलंबून आहे. राणे हे रिमोट कंट्रोल असून ते योग्य वेळ येईल तेव्हा चॅनेल बदलतील, असं नितेश राणे म्हणाले.
पुणे : नारायण राणे यांचे सुपुत्र, कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. नारायण राणे यांच्याकडे रिमोट कंट्रोल असून ते राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय योग्य वेळी घेतील, असं नितेश राणे म्हणाले. विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय नारायण राणेंवर अवलंबून आहे. राणे हे रिमोट कंट्रोल असून ते योग्य वेळ येईल तेव्हा चॅनेल बदलतील, असं नितेश राणे म्हणाले. देव जो आशिर्वाद देईल, तो मान्य करु असं सांगत पुढील राजकीय वाटचालीबद्दल लवकरच निर्णय जाहीर करणार असल्याचंही नितेश यांनी सांगितलं. महाराष्ट्राचं आणि जनतेचं संरक्षण करण्यासाठी आम्हाला शक्ती दे, असं साकडं देवाला घातल्याचं ते म्हणाले. 25 तारखेला नारायण राणे त्यांची पुढील भूमिका जाहीर करणार, अशी कुठलीही बातमी आमच्यापर्यंत पोहचली नसल्याचंही नितेश राणेंनी स्पष्ट केलं. भाजपच्या कोअर कमिटीचा निर्णय ही अंतर्गत भूमिका असल्याचंही ते यावेळी म्हणाले. काँग्रेसवर नाराज झालेल्या नारायण राणेंनी घटस्थापनेच्या मुहूर्तावर काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. मात्र आता ते नवा पक्ष स्थापन करणार की भाजपमध्ये प्रवेश करणार, याबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह कायम आहे. “तुम्ही काय माझी हकालपट्टी करता, मीच काँग्रेस सोडतो,” अशा शब्दात नारायण राणे यांनी विधानपरिषद आमदारकी आणि काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. कुडाळमधील पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली होती. या पत्रकार परिषदेत राणेंसोबत फक्त त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव निलेश हेच उपस्थित होते. त्यांचे दुसरे चिरंजीव आणि काँग्रेसचे आमदार निलेश राणे मात्र गैरहजर होते. त्यामुळे नितेश राणेंची नेमकी भूमिका काय?, राजीनामा कधी देणार यावरुन सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.