पुणे: शहरात झिका व्हायरससह डेंग्यूच्या धोक्यात वाढ झाल्याचं दिसून येत आहे. पावसामुळे डांसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे, तर गेल्या काही दिवसांमध्ये झिका व्हायरससह(Zika virus) डेंग्यूच्या(Dengue) रूग्णांची वाढती संख्या डोकेदुखी ठरत आहे. तर राज्यभरात झिकाचा(Zika virus) धोका वाढला असून, झिकाची रुग्णसंख्या ही २५ वर पोहोचली आहे. तर झिकाचे सर्वाधिक म्हणजे २३ रुग्ण पुण्यात आढळून आले आहेत, पुण्यापाठोपाठ कोल्हापूर आणि संगमनेरमध्येही प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. झिका व्हायरसचा धोका गर्भवती माता आणि तिच्या गर्भाला जास्त असल्यामुळे त्यांच्या तपासणीसाठी आरोग्य विभागाने भर दिला आहे. झिकाच्या एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक प्रमाण हे गर्भवती मातांचे आहे.
झिका व्हायरससह(Zika virus) शहरात डेंग्यूच्या(Dengue) रुग्णसंख्येतील मोठी वाढ दिसून येत आहे. या जुलै महिन्यात डेंग्यूचे एकूण २१६ संशयित रुग्ण आढळले असून, त्यातील १५६ रुग्ण हे या आठवडाभरातील आहेत. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून डासोत्पत्ती जागा शोधून त्या नष्ट करण्याचे काम सुरू आहे. डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञांनी नागरिकांना दिला आहे.
पुणे शहरातील झिकाची रुग्णसंख्या २१ वर
पुण्यामध्ये जून महिन्यात झिका व्हायरसचा(Zika virus) पहिला रूग्ण आढळला होता. त्यानंतर आता पुणे शहरातील झिकाची व्हायरसच्या रुग्णांची संख्या २१ वर पोहोचली असून, त्यामध्ये १० गर्भवती मातांचा समावेश आहेत. पुणे जिल्ह्यातील सासवड, मुळशीतील भूगाव या ठिकाणी झिकाची व्हायरसचा प्रत्येकी एक-एक रुग्ण आढळून आला आहे. झिका व्हायरसचा सर्वाधिक धोका गर्भवती मातेला आणि तिच्या गर्भाला असतो. त्यामुळे गर्भवती मातांच्या चाचण्या आणि तपासणीवर पालिकेकडून भर दिला जात आहे.
शहरात या महिन्यात डेंग्यूचे २१६ संशयित रुग्ण
पुणे शहरात जुलै महिन्यामध्ये डेंग्यूचे(Dengue) २१६ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील ५ रूग्णाचे डेंग्यूचे निदान झाले आहे. गेल्या महिन्यात संशयित रुग्णांची संख्या १५७ होती तर निदान झालेला केवळ १ रुग्ण होता. जानेवारी २०२४ ते मे २०२४ या काळात दर महिन्याला संशयित रुग्णांची संख्या १०० पेक्षा कमी होती. जानेवारी महिन्यामध्ये ९६, फेब्रुवारी महिन्यामध्ये ७५, मार्च महिन्यामध्ये ६४, एप्रिल महिन्यामध्ये ५१ आणि मे महिन्यामध्ये ४४ अशी रुग्णसंख्या होती.
त्यानंतर आता पावसाळा सुरू झाल्याने जून महिन्यापासून डेंग्यूच्या(Dengue) रूग्णसंख्येत मोठी वाढ झालेली आहे. शहरात या वर्षभरात डेंग्यूचे ७०३ संशयित रुग्ण आढळले असून, तर निदान झालेले १५ रुग्ण आहेत.
तर शहरात चिकुनगुनियाचे १५ रुग्ण आढळून आले आहेत. फेब्रुवारी महिन्यामध्ये ५, मार्च महिन्यामध्ये ४, एप्रिल महिन्यामध्ये २ आणि आता जुलैमध्ये ५ रुग्ण आहेत. दिलासादायक बाब म्हणजे शहरात यंदा एकही रुग्ण हिवतापाचा आढळून आलेला नसल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आली आहे.