Mumbai Pune Expressway: पुण्यासह शहर परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे काही भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र आहे. तर काही ठिकाणी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. तर  पुणे- मुंबई एक्सप्रेस वे (Mumbai Pune Expressway) वर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना मोठी मनस्ताप सहन करावा लागला आहे. खोपोली जवळील बोरघाटात मुंबईकडे(Mumbai) जाणाऱ्या लेनवर सखल भागात पाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचं दिसून येत आहे. या मार्गावरून वाहन चालवताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. अक्षरशः गुडघाभर पाण्यातून वाहन चालकांना वाट काढावी लागली.


पुणे शहर परिसरात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पावसाची हजेरी 


पुणे शहर परिसरात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पुण्यातील घाटमाथा परिसरात देखील जोरदार पाऊस झाला आहे. पुण्यात(Pune Rain) पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. मॉन्सून सक्रिय झाल्याने पुणे(Pune Rain) जिल्ह्यात शनिवारी दिवसभर पावसाने हजेरी लावली होती. आज (रविवारी) पहाटेपासून पावसाने हजेरी लावली आहे. आज दिवसभरात काही काळ पावसाने विश्रांती घेतली असल्याचं चित्र दिसून येत आहे.


पुणे जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. पुणे(Pune Rain) जिल्ह्यातील भोर, वेल्हा या भागात 100 मिलिमीटरच्या वरती पावसाची नोंद झाली आहे. तर मावळ आणि भीमाशंकर परिसरात 200 मिलिमीटरच्या वरती पावसाची नोंद झाली आहे.


राज्यात पावसाचा जोर वाढला


शनिवारपासून राज्यात पावसाचा जोर वाढला असून, मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, कोकण, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पाऊस झाला. रविवारी पहाटेपासूनच मुंबईत पावसाला सुरूवात झाली. शहरातील अनेक भागात पावसाची संततधार सुरू असून, पावसामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. 


आज राज्याच्या या भागात मुसळधार पावसाची शक्यता


महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह उपनगर परिसरात आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे शहर परिसरासह घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे, रायगड, ठाणे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट  देण्यात आला आहे. मराठवाड्यासह विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


VIDEO : एक्प्रेस वेवर गुडघाभर पाऊस