Pune news :  लग्नाचा हंगाम (Wedding) आता सुरु झाला आहे. लग्नात काहीतरी हटके (Pune) करण्याकडे अनेकांचा कल असतो. कुठे नवरदेवाची हेलिकॉप्टरमधून एन्ट्री होते तर कुठे मुलीची पाठवणी हेलिकॉप्टरमधून केली जाते तर कधी नवरी मुलगी थेट बुलेटवर येते. काही दिवसांपुर्वी तर एका लग्नात नवरी नवरदेवाने वेगवेगळ्या अटींचा करारनामा लिहून घेतल्याने हे लग्न चर्चेत आलं, असे तऱ्हे तऱ्हेचे प्रकार लग्नात पहायला मिळतात. असाच काहीसा हटके प्रकार पुणे जिल्ह्यातल्या ‍जुन्नर  तालुक्‍यात पहायला मिळाला आहे. नवरदेवाच्या लग्नाची वरात चक्क जेसीबीच्या बकेटमध्ये बसून निघाली.


जेसीबीचा वापर हा रस्ता खोदकाम, बांधकामाच्या ठिकाणी सहसा केला जातो, फार फार तर निवडणुक जिंकल्यावर जेसीबीमधून गुलाल किंवा भंडारा उधळ्याचे आपण पाहिलं असेल पण जुन्नरमध्ये मात्र नवरदेवाच्या लग्नाची वरात चक्क जेसीबीच्या बकेटमध्ये बसून निघाली. जुन्नर तालुक्यातील खोडद गावातील महेश गायकवाड यांच्या मुलाचं नुकतंच लग्न झालं.आपल्या मुलाच्या लग्नाची वरात एका जेसीबी चालकाने कारमधून नाही तर चक्क जेसीबीच्या बकेटमध्ये बसून काढली त्यामूळेच या हटकेबाज वरातीची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. वरातीसाठी जेसीबीची बकेट खास सजवण्यात आली होती. जेसीबीच्या बकेटमधून काढण्यात आलेली ही वरात सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती.


गावकऱ्यांची वरात पाहण्यासाठी गर्दी


जुन्नर तालुक्यातील खोडद गावात ही हटके वरात निघाली होती. या वरातीत कुटुंबीय आणि मित्रपरिवार होते. शिवाय गावकऱ्यांनी ही हटके वरात पाहण्यासाठी गर्दी केली होती. यापूर्वी गावात अशी वरात निघाली नव्हती. या गावात जेसीबीच्या वरातीची चांगलीच चर्च सुरु आहे.


जेसीबीची सजावट


साधारण लग्नात नवरदेवाची गाडी फुलांच्या माळांनी सजवली जाते. त्यातही वेगवेगळे प्रकार आणि डिझाईन्स पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे गायकवाड कुटुंबीयांनी जेसीबी फुलांच्या माळांनी सजवला होता. या जेसीबीच्या बकेटमधून नवरी-नवरदेवाची वरात काढण्यात आली.


हटके वरातीची चर्चा 


यापूर्वी गुजरातमधील नवसारी गावात अशीच एक वरात निघाली होती. या वरातीला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर अनेकांनी त्यांच्या या हटके वरातीचं कौतुक केलं. त्यांचीच आयडिया जुन्नरच्या या गायकवाड यांनी घेतली आणि त्यांनीही जेसीबीतून वरात काढण्याचं ठरवलं. त्याप्रमाणे त्यांनी जेसीबी सजवला आणि नवदाम्पत्यांची थेट जेसीबीतून वरात  काढली