Pune Bypoll election : कसबा पेठ आणि चिंचवड या विधानसभा मतदार संघाच्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.  कसबा पेठ विधानसभा निवडणूक निरीक्षक नीरज सेमवाल तसेच निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे- देवकाते यांच्या उपस्थितीत मतमोजणीसाठी नेमलेल्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. श्रीमती किसवे- देवकाते आणि भंडारे यांनी आज प्रशिक्षणादरम्यान मतमोजणी कर्मचाऱ्यांना मतमोजणी करताना घ्यायची काळजी, भरायचे विविध नमुने (फॉर्म) आदीबाबत सूचना दिल्या. इव्हीएमवरील उमेदवारनिहाय मतांची मोजणी आणि नोंद, फॉर्म भरणे, निवडणूक आयोगाच्या एन्कॉर ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये माहिती भरणे, मतमोजणीनंतर पुन्हा इव्हीएम सीलिंग करणे, साहित्य पुरवठा याबाबत प्रशिक्षण दिले. मतमोजणी प्रक्रियेदरम्यान भारत निवडणूक आयोगाच्या सर्व निर्देशांचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना यावेळी देण्यात आली.


मतमोजणीच्या 20 फेऱ्या


मतमोजणी 2 मार्च रोजी सकाळी आठ वाजता भारतीय खाद्य निगम (एफसीआय) गोदाम, कोरेगाव पार्क पुणे येथे सुरू होणार आहे. त्यासाठी मतमोजणीच्या 20 फेऱ्या होणार आहे. ईव्हीएम मतमोजणीसाठी 14टेबल तर टपाली मतपत्रिकांसाठी आणि सर्व्हिस वोटर्ससाठीच्या इटीपीबीएससाठी (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम) प्रत्येकी एक टेबल ठेवण्यात आला आहे. सर्वप्रथम टपाली आणि ईटीपीबीएसची मोजणी होईल. त्यानंतर ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर 1 मतमोजणी पर्यवेक्षक, 1 मतमोजणी सहायक आणि 1 सूक्ष्म निरीक्षक असे एकूण सुमारे 50 अधिकारी- कर्मचारी नेमण्यात आले आहेत. 


चिंचवडमध्येही मतमोजणीची तयारी पूर्ण


चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला गुरुवार 2 मार्च रोजी सकाळी 8 वाजेपासून थेरगाव येथील शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथे सुरुवात होणार असून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी मतमोजणी केंद्राची पाहणी केली. मतमोजणीच्या एकूण 37 फेऱ्या होणार आहेत, अशी माहिती श्री. ढोले यांनी दिली आहे. त्यांनी इटीपीबीएस( इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम फॉर सर्व्हीस वोटर) या प्रणालीच्या प्रात्यक्षिक कामकाजाची चाचणीसह डॉ.देशमुख यांना माहिती दिली. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीच्यादृष्टीने निवडणूक यंत्रणेची आवश्यक सर्व तयारी पुर्ण झाली असून मतमोजणीसाठी प्रत्येकी 14 टेबल अधिक टपाली मतपत्रिकांसाठी 1 टेबल असे एकूण 15टेबल असणार आहेत. 18 पर्यवेक्षक, 18 सहायक आणि 18 सूक्ष्म निरीक्षकांची यासाठी नेमणूक करण्यात आली आहे. 


कसबा मतदारसंघात अटीतटीची लढाई तर चिंचवडमध्ये तिरंगी लढाई


कसबा मतदारसंघासाठी भाजपकडून हेमंत रासने आणि कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यात काँटे की टक्कर आहे. दोन्ही उमेदवारांकडून या निवडणुकीसाठी धुमधडाक्यात प्रचार करण्यात आला आहे. भापजकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यासह 40 स्टार प्रचारकांची मोठी फौज पुण्यात दाखल झाली होती. त्यासोबतच महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही कोपरा सभा आणि रोड शो केले आहेत. त्यामुळे कसब्यात नेमकी कोण बाजी मारणार?,हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे नाना काटे, भाजपच्या अश्विनी जगताप आणि अपक्ष राहुल कलाटे यांंच्यात लढत आहे.