आळंदी ,पुणे : आळंदीत (Alandi) उपोषणाला बसलेल्या महाराज कोकरेंची (Bhagwan Kokre) तब्येत खालावली आहे. पोलिस आणि प्रशासनाने बळजबरीने रुग्णालयात भरती केले (Alandi) संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीत वारकरी संप्रदायाकडून (Hunger strike) उपोषण सुरू होते. यासाठी भगवान कोकरे हे उपोषणासाठी बसले होते. मात्र आज त्यांना पोलीस आणि प्रशासनाने बळजबरीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं आहे.
सकाळी त्यांचा रक्तदाब वाढला तर रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाले. त्यामुळं त्यांची प्रकृती चिंताजनक स्थितीत आली होती. हे पाहता त्यांच्यावर तातडीनं उपचार होणं गरजेचं होतं. म्हणून दिघी पोलिसांनी उपोषणस्थळावर रुग्णवाहिका बोलावली. मात्र कोकरे मंचावरून जागचे हलायला तयार नव्हते. त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यांना परिस्थिती आणि तब्येतीवर परिणाम होईल, असंही सांगितलं. मात्र ते कोणाचंही ऐकत नसल्याने त्यांना बळजबरीनं रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
समान नागरी कायदा, आर्थिक निकषावर मराठा समाजाला आरक्षण द्यावं, इंद्रायणी नदीला प्रदूषणातून मुक्त करावं, शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव द्यावा, अशा विविध मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार, अशी भूमिका त्यांनी आज ही घेतली. मात्र कोकरे महाराज यांची तब्येत पाहता, पोलीस आणि प्रशासनाने त्यांना थेट उचलून रुग्णवाहिकेत बसवलं. तिथून पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात त्यांना पुढील उपचारासाठी भरती करण्यात आलं आहे.
भगवान कोकरे महाराजांच्या मागण्या कोणत्या?
देशात कोणत्याही परिस्थीतीत समान नागरी कायदा येणं गरजेचं आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळणं आणि स्वच्छतेचा मुद्दाही वारंवार समोर येत आहे. जातीगत आरक्षणामुळे हिंदू समाज वाटला जात आहे. त्यामुळे आरक्षणामुळे समाजात वाद निर्माण होत असतील. मराठा आरक्षणाचा मुद्दा जर मार्गी लावता येत नसेल तर जातीवरचे आरक्षण रद्द करुन सरकरट आर्थिक निकषांवर आरक्षण देणं हे भविष्यासाठी चांगलं आहे. त्यामुळे 1 नोव्हेंबरपासून या उपोषणाला सुरुवात केली आहे.
विविध उपोषण...
1 नोव्हेंबरपासून कोकरे महाराज आळंदीत उपोषणाला बसले आहेत. त्यांच्यासोबत वारकरी सांप्रदायातील अनेक वारकऱ्यांचा त्यांना पाठिंबा आहे. मागील 8 दिवस ते आळंदीत उपोषणाला बसले आहेत. यापूर्वीही त्यांनी अनेकदा उपोषणं केली आहेत. विविध मागण्या समोर ठेवून त्यांनी उपोषण केलं आहे. रत्नागिरी लोटे एमआयडीसीतील गोशाळेच्या प्रश्नावरून भगवान कोकरे यांचे मागील 11 दिवस उपोषण केलं होतं.