पुणे : कोयता शेतीचं अवजार म्हणून वापरला जायचा तो कोयता आता दहशत निर्माण करण्यासाठी वापरला जातोय. कधी गाड्यांची तोडफोड करण्यासाठी, कधी दोन गटातील राड्यासाठी तर कधी एकतर्फी प्रेमासाठी कोयता उगारला जातोय. पुण्यातील (Pune News) सदाशिव पेठेत तरुणीवर झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच आता एका तरुणाने थेट कॉलेजमध्येच कोयता काढला. पोलिसांनी तात्काळ घटनेची गांभीर्याने दखल घेत  तरुणाला  अटक केली आहे. एवढच नाही तर  अशा घटनांना चाप बसावा आणि तरूणाला अद्दल घडवण्यासाठी आरोपीची कॉलेजमध्ये  चक्क धिंड काढली आहे 


कुणाल कानगुडे (19 वर्षे) असे या आरोपी तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी कुणालचे आबासाहेब गरवारे महाविद्यालयात डॅनी या तरुणाशी काही वाद झाले होते. त्यानंतर कॉलेजमध्ये दहशत राहावी तसेच काही भांडणाच्या कारणामुळे त्याने थेट कॉलेजमध्ये कोयता काढून दहशत माजवली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कॉलेजमधील सीसीटीव्ही तपासून त्याला अटक करून डेक्कन परिसरातून त्याची धिंड काढली.


अल्पवयीन मुलांमध्ये देखील गुन्हेगारी प्रवृत्ती


दरम्यान पुणे शहरात गुन्हेगारी फोफावत असताना आता अल्पवयीन मुलांमध्ये देखील गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याचे चित्र आहे. शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असल्याने याचा प्रभाव थेट विद्यार्थ्यांवर होताना दिसून येत आहे. किरकोळ कारणातून विद्यार्थी देखील भान विसरून अनुचित प्रकार घडवत आहेत. त्यामुळे पालकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. या अगोदर बऱ्याचदा शहरात महाविद्यालयीन तरुणांमध्ये हाणामारी झाल्याचं पाहायला मिळाला आहे.


पुण्यात कोयता, कुऱ्हाड घेऊन दहशत माजवण्याचा पॅटर्न


गेल्या काही महिन्यांपासून पुण्यातील अनेक परिसरात रोज एक भाई आणि त्यांच्या टोळ्या तयार होताना दिसतायत. वय अवघे 18- 25 , अंगावर एखादा टी शर्ट टाकायचा, फाटलेली पँट घालायची, खिशात रुमाल, तोंडावर मास्क आणि हातात कोयता अशी ओळख या नवीन भाई लोकांची तयार झाली आहे. त्यामुळे पुण्यात नव्या भाईगिरीचा उदय झाला आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. पुण्यातली भाईगिरी काही नवीन नाही पण कोयता, कुऱ्हाड घेऊन दहशत माजवण्याचा पॅटर्न सध्या अनेक महिन्यांपासून शहरातील मध्यवर्ती भागात पाहायला मिळतोय. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा टोळक्यांना ठोकून काढणार असे सांगितले आहे त्यामुळे आता तरी अशा गुन्हेगारांना खाकी पोलिसांचा वचक बसतो का हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.


हे ही वाचा :