पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंगळवारी विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या  हद्दीत  दुपारच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. 


तरुणाने मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत नैराश्यातून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. त्रिभुवन कावले (वय 30) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो मूळचा जालन्याचा रहिवासी आहे.  शिक्षण पूर्ण झाल्यापासून तो पुण्यात 'एमपीएससी'च्या परीक्षेची तयारी करत होता.


याप्रकरणी मिळालेली प्राथमिक माहितीनुसार, त्रिभुवन जानेवारी 2021 पासून पुण्यात राहत होता. पुण्यात तो आपल्या मित्रांसोबत राहत होता. आज दुपारच्या सुमारास त्याच्या राहत्या खोलीत तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने लिहिलेली एक चिठ्ठी पोलिसांना सापडली असून नैराश्यातून त्याने हे कृत्य केले असल्याचे समोर आले आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.


राज्यातील तरुणाईभोवती पसरलेलं एमपीएससीचं मायाजाल किती जीवघेणं बनलंय हे पुन्हा एकदा दिसून आलं आहे. खासकरून ग्रामीण भागातील तरुणांना सरकारी नोकरी मिळवून अधिकारी बनवण्याच स्वप्न ज्या एमपीएससीमुळे पडतं त्या एमपीएससीची निवड प्रक्रिया कमालीच वेळखाऊ आणि तेवढीच असंवेदनशील बनल्याने लाखो तरुणांची उमेदीची वर्षं एमपीएससीच्या मृगजळामागे लागल्याने वाया जात आहेत. 


महाराष्ट्रात दरवर्षी साधारणपणे 18 ते 20 लाख तरुण एमपीएससीची परीक्षा देतात. मात्र वेगवेगळ्या खात्यांमधील दरवर्षी भरल्या जाणाऱ्या पदांची संख्या असते चार ते पाच हजार. मात्र वेळेत परीक्षा घेऊन वेळेत निकाल लावण्याचं काम राज्य लोकसेवा आयोग कधीच करत नाही. मागील दोन वर्षांपासून आधी राज्यात सुरु असलेल्या मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट राहिल्यानं तर नंतर कोरोनामुळे दोन वर्षे वाया गेली. या सर्व परिस्थिमुळे विद्यार्थ्यांना नैराश्य येत आहे सरकार आणि राज्य लोकसेवा आयोगाकडून तातडीनं पावलं टाकली जाणं गरजेचं आहे.