Pune University Students Protest : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आक्रमक वळण लागले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP Protest) कार्यकर्त्यांनी पुणे विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकांच्या कार्यालयात घुसून आंदोलन केले. यावेळी सुरक्षा रक्षकांनी परीक्षा नियंत्रक कार्यालयाचे गेट बंद करण्यात आले होते. मात्र, विद्यार्थ्यांनी त्यांना न जुमानता प्रवेशद्वारमध्ये घुसून आंदोलन केले. 


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी युवक क्रांती दल आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने आंदोलन करण्यात आले.  यावेळी अभाविपकडून उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. विद्यापीठात पूर्णवेळ कुलगुरू. प्र-कुलगुरू, कुलसचिव नसल्याने विद्यापीठातील कारभारावर कोणाचे नियंत्रण नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत असल्याचा आरोप अभाविपने केला. यावेळी विद्यापीठाचे प्रशासन व्हेंटिलेटरवर असल्याचे दर्शवण्यासाठी अभाविपने चक्क रुग्णवाहिका विद्यापीठात आणली होती. 


पुणे विद्यापीठ प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे मागील काही महिन्यांपासून विद्यार्थ्यांना नाहक त्रास होत आहे. परीक्षा विभागाच्या अनागोंदी कारभाराचा मोठा फटका विद्यार्थ्यांना बसला असल्याचे विद्यार्थी संघटनांनी म्हटले. विद्यापीठाने जारी केलेल्या निकालात अनेक विद्यार्थ्यांना चुकीचे गुण देण्यात आले आहेत. काहींना शून्य गुण दिले असल्याचा दावा अभाविपच्या कार्यकर्त्यांनी केला. परीक्षा विभागाच्या या भोंगळ कारभाराची भरपाई म्हणून परीक्षा शुल्क माफी देण्याची मागणी अभाविपने केली आहे. 


पुणे विद्यापीठाला अद्यापही पूर्णवेळ कुलगुरू व इतर मुख्य प्रशासकीय अधिकारी नसल्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत असल्याचा दावा विद्यार्थी संघटनांनी केला आहे. विद्यार्थी समस्यांच्या गर्तेत असताना दुसरीकडे प्रभारी कुलगुरू व इतर अधिकारी दौऱ्यावर असतात असाही आरोप केला जात आहे. 


विद्यार्थ्यांच्या धरणे आंदोलनाला प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद न आल्याने अभाविपच्या कार्यकर्त्यांनी परीक्षा नियंत्रक विभागाच्या कार्यालयावर धडक मारली. आंदोलकांना रोखण्यासाठी प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. त्यानंतरही प्रवेशद्वारावरून उडी मारत, सुरक्षा रक्षकांना हुलकावणी देत कार्यालय परिसरात कार्यकर्त्यांनी धडक मारली. 


दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पुणे विद्यापीठातील वीज 24 तासांसाठी खंडित झाली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला होता.  विद्यापीठात प्रवेश घेताना वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगळी फी आकारली जाते. त्यात अनेक वसतीगृह, ग्रंथालयाचा समावेश असतो. प्रवेश घेत असताना मात्र वीजेपासून सगळ्या सोयी सुविधा पुरवल्या जातील अशी आश्वासनं विद्यार्थ्यांना दिली जातात. मात्र विद्यापीठात आल्यावर वेगळी परिस्थिती बघायला मिळत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: