Pune Sppu Rap Song Shoot :  सावित्रीबाई फुले विद्यापीठात (savitribai phule pune university) अश्लील भाषेतील (Pune Crime News) रॅप सॉंगचं शुटींग (Rap song shooting) केल्याचं प्रकरण सध्या चांगलंच गाजत आहे. रॅपर असलेल्या शुभम जाधववर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याच प्रकरणात धक्कादायक बाब अशी की, या गाण्यात जो आगीचा सीन आहे. हा सीनदेखील पुणे विद्यापीठातील परिसरात शुट केल्याचं समोर आलं आहे. आग वाढल्याने अग्निशमन दलाला बोलवण्याची वेळ विद्यापीठ प्रशासनावर आली होती.  मात्र इतका गंभीर प्रकार घडून देखील गाणं व्हायरल झाल्यावर हा सगळा प्रकार समोर आला. 


या प्रकरणात रॅप तयार करणाऱ्या शुभम जाधवच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला शुटिंगची परवानगी देणाऱ्या विद्यापीठ प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याची पोलीसांकडून शुक्रवारी चौकशी करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या समोर चोवीस तास सुरक्षारक्षकांचा पहारा असतो. आतमध्ये जाणाऱ्या प्रत्येकाची चौकशी करण्यात येते. तरीदेखील या रॅपरने थेट ज्या खुर्चीवर कुलगुरु बसतात त्या खुर्चीवर बसून आणि समोरच्या टेबलवर दारुची बाटली ठेवून हे रॅप सॉंग शूट केले आहे.  त्याचबरोबर विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या समोर देखील हातात तलवार आणि पिस्तूल घेऊन या रॅप सॉंगचा काही भाग शूट झाला आहे. 


उच्चस्तरीय समिती नेमली...


रॅप सॉंग प्रकरणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात चित्रित केलेल्या गाण्याच्या संदर्भाने आता उच्चस्तरीय चौकशी समितीकडून संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. बागेश्री  मंठाळकर, निवृत्त कॅप्टन चंद्रशेखर चितळे, डॉक्टर विलास आढाव हे या समितीचे सदस्य आहेत. एक महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे.


कुलसचिवांनी दिली परवानगी...


या संपूर्ण प्रकरणानंतर विद्यापिठातील अधिसभा भरते त्या ठिकाणी किंवा विद्यापीठात अशा अश्लील भाषा वापरलेल्या रॅपचं शुटींग करायला नेमकी परवानगी कोणी दिली?, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर या शुटींगसाठी विद्यापीठ प्रशासनाकडून मदत करण्यात आल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर रॅपर शुभमनेदेखील शुटींगसाठी कुलसचिव प्रफुल्ल पवार यांनी तोंडी परवानगी दिल्याचा दावा केला आहे. त्यानंतर आता दोघांचीही सखोल चौकशी करण्यात येणार आहे. 


संबंधित बातमी-


Pune Sppu Rap Song Shoot : रॅप सॉंगच्या शुटींग विरोधात विद्यापीठ प्रशासन अॅक्शन मोडवर; उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली