Pune Sppu Rap Song Shoot :  रॅप सॉंग प्रकरणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून   (Pune Crime News)  उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात चित्रित केलेल्या गाण्याच्या संदर्भाने आता उच्चस्तरीय चौकशी समितीकडून संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. बागेश्री  मंठाळकर, प्रसेंजित फडणवीस, निवृत्त कॅप्टन चंद्रशेखर चितळे, डॉक्टर विलास आढाव हे या समितीचे सदस्य आहेत. एक महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे


विद्यापीठ प्रशासनाने पत्र काढत ही माहिती दिली आहे. या समितीमध्ये विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य बागेश्री मंठाळकर, अधिसभा सदस्य प्रसेनजीत फडणवीस, प्रतिष्ठित प्राध्यापक निवृत कॅप्टन चंद्रशेखर चितळे, आजीवन अध्ययन व विस्तार केंद्राचे संचालक डॉ. विलास आढाव आणि उपकुलसचिव डॉ. मुंजाजी रासवे (सदस्य- सचिव) आदींचा समावेश आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून एक महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. कारभारी काळे यांनी समितीला दिले आहेत.


काय आहे संपूर्ण प्रकरण?


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत आणि ज्या ठिकाणी विद्यापीठाची अधिसभा भरते तिथे अश्लील भाषेतील रॅपचं शूटिंग केल्याच समोर आलं होतं.  ज्या खुर्चीवर कुलगुरु बसतात त्या खुर्चीवर बसून आणि समोरच्या टेबलवर दारुची बाटली ठेवून शुभम जाधव नावाच्या रॅपरने हे रॅप सॉंग शुट केलं . त्यामुळे विद्यापीठ प्रशासनातील व्यक्तींकडून शुभमला हे रॅप सॉंग तयार करण्यासाठी मदत करण्यात आल्याचं स्पष्ट झालं. त्याच्यावर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असला तरी त्याच्यावर कारवाई झालेली नाही. या प्रकरणी विद्यापीठाच्या बड्या अधिकाऱ्याची चौकशी केली जाणार आहे. काही दिवसांपूर्वी शुभमच्या रॅप सॉंगचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला होता. विद्यापीठ प्रशासनाने या प्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांत तक्रार दिली होती.  त्याने केलेल्या या कृत्यामुळे प्रशासनाने संताप व्यक्त केला  होता. मात्र आता विद्यापीठ प्रशासनातील व्यक्तींकडून शुटींगसाठी मदत मिळाली असल्याचं समोर आल्याने खळबळ उडाली होती. 


कुलसचिवांनीच दिली परवानगी; रॅपरचा दावा


शुटींगला विद्यापीठ प्रशासनाकडून मदत करण्यात आल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर रॅपर शुभमनेदेखील शुटींगसाठी कुलसचिव प्रफुल्ल पवार यांनी तोंडी परवानगी दिल्याचा दावा केला आहे. त्यानंतर आता दोघांचीही सखोल चौकशी करण्यात येणार आहे.