पुणे : गायिका केतकी माटेगावकरच्या चुलत भावाने पुण्यात आत्महत्या केली आहे. नोकरी लागत नसल्यानं त्याने हे टोकाचं पाऊल उचलले, तसं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिट्ठीत त्याने नमूद केलं आहे. अक्षय माटेगावकर असं त्याचं नाव होतं. वयाच्या 21व्या वर्षी त्याने सुसगाव येथील इमारतीच्या आठव्या मजल्यावरून त्याने उडी घेतली, अशी माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली आहे.
अक्षय सिम्बॉयसिस महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्स विभागाच्या चौथ्या वर्षात शिक्षण घेत होता. सुसगाव येथील माउंट युनिक सोसायटीच्या आठव्या मजल्यावर मित्रांसमवेत राहत होता. अक्षयची आई मीनल माटेगावकर या मुंबईत प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत, वडील अमोल माटेगावकर हे नामांकित कंपनीत मेकॅनिकल इंजिनिअर पदावर आहेत. तर अक्षयची जुळी बहीण आकांक्षा माटेगावकर ही लोणी येथील एमआयटी महाविद्यालयात डिझायनिंगच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेते. ती नांदेड सिटी येथील चुलत्यांकडे राहायला आहे. माटेगावकर कुटुंबातील हे सदस्य आपापल्या क्षेत्रात व्यस्त असताना ही घटना घडल्याने त्यांना मोठा धक्का बसलाय.
अक्षय नोकरीला घेऊन खूपच सिरीयस होता. यासाठी तो मोठी मेहनत ही करत होता. नुकतीच त्याने एका आयटी कंपनीत इंटर्नशिप केली होती. त्यानंतर काही कंपन्यांमध्ये नोकरीसाठी त्याने अर्ज ही केले होते. मात्र नोकरी मिळविण्यात त्याला यश येत नव्हतं. आता नोकरी भेटणार नाही, या भीतीनं त्याच्या मनात घर केलं होतं. यातूनच त्याने आत्महत्या करण्याचा पर्याय अवलंबला. तत्पूर्वी एक चिट्ठी त्याने लिहून ठेवली.
माझ्या आयुष्यातील प्रत्येकाची मी माफी मागतो.
ही शेवटची गोष्ट असेल मी लिहतोय. माझ्याकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे, मी तुमची माफी मागतो. मी खूप प्रयत्न केले, पण मला ते जमले नाही. मी इंटर्नशिपमध्ये चांगली कामगिरी करण्याचा खूप प्रयत्न केला , पण तिथेही मी खराब झालो . हे पाहिल्यावर मला माहित आहे की मी नोकरी मिळवू शकत नाही आणि हे तुम्हाला सांगण्याचे धाडस माझ्यात नाही. शिवाय माझ्याकडे दुसरा कोणता पर्याय नाही. आई - बाबा आणि आकांक्षा, मला माफ करा. मी निघालो.
तुमचा, अक्षय माटेगावकर
असा आशय त्यात नमूद केला आणि अक्षयने आठव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. हिंजवडी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.