पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) आणि सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (Serum Institute of India) संस्थापक सायरस पुनावाला (Cyrus Poonawalla) यांच्यातली मैत्री आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. पुण्यातील बीएमसीसी महाविद्यालयात दोघांनी एकत्र शिक्षण घेतलं. पुण्यात वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानासाठी डॉ. सायरस पुनावाला यांना वनराई फाउंडेशन तर्फे शरद पवार यांच्या हस्ते 'स्व. डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार' प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमावेळी शरद पवारांनी सायरस पुनावाला आणि त्यांच्या कॉलेजचे काही किस्से सांगितले. त्यासोबतच सिरम इन्स्टिट्यूटचा जन्म कसा झाला? सायरस  पुनावाला यांच्या आवडीनिवडीबाबत शरद पवारांनी सांगितलं. त्यासोबत काही कॉलेजमधील गमतीजमतीदेखील सांगितल्या. 



कॉलेजमधील किस्सा सांगताना शरद पवार म्हणाले की, सायरस पुनावाला यांच्याबाबत  काही  गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. आम्ही दोघे एका वर्गात होतो. आम्ही एका  वर्गात शिकलो, पण अभ्यास कधी केला नाही. पण, बाकीच्या सर्व गोष्टी आम्हा  लोकांच्या लक्षात असायच्या. कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये आम्हा लोकांचा दिवस  जायचा, कारण संबंध पार्श्वभूमी ही वेगळी होती. त्यांच्या वडिलांचे  फर्निचरचे दुकान होते आणि तशी4-5 दुकाने होती. त्यांच्या दुकानांमध्ये कधी  आम्ही जात असू आणि एकंदर त्यांची काय स्थिती होती याची स्थिती आम्हा  सर्वांना माहिती झालेली होती.


सिरम इन्स्टिट्यूटचा  जन्म कसा झाला?


पुढे बोलताना ते म्हणाले की,   कॉलेजमध्ये  शिकत असताना त्यांना घोड्यांबद्दल अतिशय आस्था होती. आणि त्यांनी घोडे  देखील विकत घेतलेले होते. त्या घोड्यांच्या शेपटीतून रक्त काढून वॅक्सिन  बनवता येते हे सायरस यांच्या डोक्यामध्ये त्या काळापासून होते. आणि हळूहळू  या सर्व गोष्टीतून ते यशस्वी झाले. आणि त्यातूनच या सिरम इन्स्टिट्यूटचा  जन्म झाला. सिरम  इन्स्टिट्यूट आधी खूप लहान होते. अतिशय लहान जागेपासून त्यांची सुरुवात  झाली. त्यांचे आत्ता वाढलेले प्रमाण हे आपण सर्वांनी पाहिलेले आहे. आता  जगात ही एक उत्तम प्रकारची इन्स्टिट्यूट झालेली आहे. ज्या ज्या वेळी  जगामध्ये संकटे आली, तेव्हा उत्तर देण्याचे काम हे भारताने दिले आणि भारतात  ते कोणी दिले असेल तर ते सिरम इन्स्टिट्यूटने दिले, याचा अभिमान आपल्या  सर्वांना आहे.


कोट्यवधींचे वॅक्सिन सायरस यांनी मोफत दिलं!


जगामध्ये  गेल्या काही वर्षात करोनाचे संकट आले आणि लोक घाबरून घरामध्ये बसलेले होते.  घराच्या बाहेर पडत नव्हते. देशाच्या नेतृत्वाने देखील सांगितले की,  घराच्या बाहेर पडू नका. दुसऱ्या बाजूने रुग्णांची संख्या वाढत होती. त्याला  उत्तर देण्यासंबंधीचे वॅक्सिन हे सायरस पुनावाला यांनी तयार केले आणि ते  देशामध्ये आणि देशाच्या बाहेर आता पोहोचलेले आहे. मला सांगायला अभिमान  वाटतो की, त्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या सबंध जिल्ह्यांमध्ये सिरम  इन्स्टिट्यूटचे वॅक्सिन हे जवळपास ठिकठिकाणच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही मोफत  पुरवलं, ते कोट्यवधींचे वॅक्सिन सायरस यांनी आम्हाला मोफत दिलं. माझ्यासमोर  आता हे डॉ. जगताप इथे बसलेले आहेत. 2 दिवसांपूर्वी त्यांनी मला सांगितलं  की, कॅन्सरचे एक नवीन वॅक्सिन तयार केलेले आहे आणि ते ग्रामीण भागातल्या  मुलींना देण्याची आवश्यकता आहे. आणि ते आपल्याकडे मिळेल का? वॅक्सिन म्हटलं  की आपल्या डोक्यात एकच नाव, सिरम इन्स्टिट्युट. त्यांना सिरम  इन्स्टिट्यूटने केलेल्या मदतीमुळे आज कित्येक मुलींना त्या वॅक्सिन मिळालेल्या आहेत.


 


 


इतर महत्वाची बातमी-


सायरस पूनावाला यांना पद्मभूषण पुरतं मर्यादित न ठेवता, भारतरत्न द्यावा; शरद पवारांचं केंद्र सरकारला आव्हान