पुणे : पुणे शहाराच्या मधोमध मुठा नदीच्या काठावर असलेले सलीम अली पक्षी अभयारण्य इथं आढळणाऱ्या देशी - विदेशी पक्षांसाठी ओळखलं जातं. मात्र गेल्या काही दिवसांपासून रस्त्याने होणारी अतिक्रमणं आणि महापालिकेकडून त्याकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळं पुण्याचं फुफ्फुस म्हणवणारं हे अभयारण्य धोक्यात आलं आहे.
पुणे शहराच्या अगदी मधोमध घनदाट जंगल टिकून असून पक्षी अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. मुठा नदीच्या काठावरील 22 एकरांच्या या हिरव्या पट्ट्यात शेकाट्या, तांबट, नदी सुरय, राखी बगळा, कोतवाल, सातभाई, पारवा, पोपट लालबुड्या बुलबुल, पोपट असे देशी आणि युरेशियन स्पुनबिल, कॉमन तिल , नॉर्दर्न पाइंन्टेल , गर्गनेई असे अनेक विदेशी पक्षी आढळतात . शिवाय शेजारच्या मुठा नदीतही हळदी - कुंकू, टिबुकली, गायबगळा, खंड्या, धोबी, टिटवी अशा पाणथळ भागात राहणाऱ्या पक्षांचा किलबिलाट सुरु असतो . मात्र आता हे सगळं धोक्यात आले आहे. कारण दररोज इथं ट्रक भरभरून राडा रोडा टाकला जात आहे. त्यामुळं मुठा नदीचं पात्र येथे तब्ब्ल वीस ते बावीस फूट उंच उचललं गेलंय. त्याचा परिणाम या नदीकाठावर आढळणाऱ्या झाडांवर आणि पक्षांवर तर होत आहे. शिवाय पावसाळ्यात पुराचा धोकाही त्यामुळं निर्माण झालय.
देशी - विदेशी अशा एकशे तीसहून अधिक पक्षांचा अधिवास असल्यानं अनेक पक्षीनिरीक्षक येथे पक्षी निरीक्षणासाठी येत असतात. पण दिवसेंदिवस इथं होणाऱ्या अतिक्रमणांमुळे आणि त्यासाठी केल्या जात असलेल्या झाडांच्या कत्तलीमुळे हे पक्षीही दिसेनासे झाले आहेत. मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या पक्षांमुळे उद्योजक वाडिया कुटुंबीयांनी सत्तरच्या दशकात ही जमीन पक्षी अभयारण्यासाठी महापालिकेला दान केली . पण पुणे महापालिकेला हा ठेवा जपता आलेला नाही . बिल्डरांकडून होणारी अतिक्रमणं आणि राडा रोड्यासह कचराही इथं मोठ्या प्रमाणात टाकण्यात येतोय . महापालिकेतील अधिकाऱ्यांकडून याकडे कानाडोळा केला जात असल्याने आता राज्याचे पर्यावरण मांत्री आदित्य ठाकरेंनी यामध्ये लक्ष घालूनही जागा वनविभागाकडे सोपवावी अशी मागणी होत आहे
वेगाने वाढणाऱ्या पुण्यातील हिरवळ तेवढ्याच वेगाने कमी होत गेली आहे. पुण्याभोवतालच्या टेकड्या गिळंकृत केल्यानंतर आता या अभयारण्याचे लचके तोडण्याचे प्रयत्न होत आहे. ते वेळीच रोखले नाहीत तर पुण्याचं हे वैभव इतिहासजमा होण्यास वेळ लागणार नाही.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
इतर महत्त्वाच्या बातम्या :