Pune Crime News : स्क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास नफा (Pune Crime News) मिळवून देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला पुणे सायबर पोलिसांनी अटक केली आहे. राहुल राठोड असं या भामट्याचं नाव आहे. त्याच्यासोबत त्याच्या कंपनीचा मॅनेजर ओंकार सोनवणे यालाही अटक करण्यात आली आहे. राहुल राठोडने फसवणूक करुन मिळवलेल्या पैशातून खरेदी केलेली ऑडी कार आणि डुकाटी बाईक देखील पोलिसांनी जप्त केली.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल राठोड हा क्रिप्टो बीझ ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा मालक आहे. देशभरातील गुंतवणूकदारांना कंपनीच्या विविध स्टेकिंग प्रोग्रॅममध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल असे आमिष दाखवून त्याने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. त्यापैकी 44 जणांची तब्बल 2 कोटी 94 लाखांची फसवणूक आतापर्यंत उघडकीस आली आहे.


पोलिसांनी राठोड याच्या बँक खात्यातील 28 लाख रुपये तसेच क्रिप्ट वॉलेटमधील तीन लाखांचे पॉईंट्सही जप्त केले आहेत. राठोड याची पत्नी मूळची थायलंड देशातील रहिवासी असून तिच्या परदेशातील बँक खात्यावर अथवा परदेशात आरोपीने काही गुंतवणूक केली आहे का? मालमत्ता खरेदी केली का? याबाबत पोलिसांनी तपास सुरु केला आहे. 


मॅनेजरलाही फसवणुकीच्या कटात सामील केलं 


राठोड याने त्याचा मॅनेजर ओमकार सोनवणे यालाही फसवणुकीच्या कटात सहभागी करुन घेतले होते. त्याला पगारासोबत वेगवेगळे कमिशन देऊन परदेशवारी घडवून आणल्याचेही पोलीस चौकशीत निष्पन्न झाले आहे. संबंधित आरोपींच्या विरोधात तेलंगणा, हरियाणा, दिल्ली इत्यादी ठिकाणच्या गुंतवणूकदारांकडून तक्रारी दाखल करण्यात येत आहेत. 


पोलीस राहुल राठोडच्या कारवायांचा तपास करत आहेत आणि अशा घोटाळ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. त्यांनी गुंतवणूकदारांना कोणताही पैसा गुंतवण्यापूर्वी गुंतवणुकीच्या संधींचा सखोल अभ्यास करण्याचा सल्ला दिला आहे आणि कोणत्याही संशयास्पद हालचालींची माहिती अधिकार्‍यांना त्वरित कळवावी, असंही आवाहन त्यांनी केलं आहे. 


कोट्यवधी रुपयांच्या आलिशान गाड्यांची खरेदी


या राठोडने आतापर्यंत अनेक लोकांना आमिष दाखवून अनेकांना मोठा गंडा घातला आहे. यातून कोट्यवधी रुपये कमावले आहेत. त्यातून या दोघांनीही आलिशान कार खरेदी केल्या आहेत. डुकाटी आणि ऑडी या कार त्याने खरेदी केल्या आहेत. मात्र हा सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे आणि त्याच्याकडून आलिशान कारदेखील जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी दोघांची सखोल चौकशी पोलिसांकडून केली जात आहे.